दवाखान्यात नाही खाट, स्वाइन फ्लूने लावली वाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना प्रतिनिधी । नाशिक 

डेंग्यू, स्वाइन फ्लू, मलेरियासह साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले आहे. नागरिकांचे बळी जात आहेत. शहरवासीयांचा जीव धोक्यात आणल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेत जोरदार आंदोलन केले. ‘दवाखान्यात नाही खाट, डेंग्यूने लावली वाट’, ‘डेंग्यू, स्वाइनची साथ, हाच सबका विकास’ अशा घोषणा देत अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. दत्तक नाशिकचे पिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच साथीचे रोग वाढण्यासाठी सर्व प्रकारच्या डासांना मुक्त संचार करता यावा यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे उपरोधिक निवेदनही दिले.

साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असताना महापालिका प्रशासन सुस्त आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. ‘दवाखान्यात नाही खाट, डेंग्यूने लावली वाट’, ‘सत्ताधारी मदमस्त, डेंग्यूने नाशिककर त्रस्त’, ‘स्मार्ट सिटीची लहर, डेंग्यूने केला कहर’, ‘म्हणे भाजपाची लाट, डेंग्यूने लावली वाट’, ‘डेंग्यू, स्वाइनची साथ, हाच सबका विकास’ आदी घोषणा देत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात ठिय्या मांडला. शहरातील रोगराईची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूचे बळी दिवसेंदिवस वाढत आहेत, अशी माहिती दिली. तातडीने उपाययोजना झाल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने तीक्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सर्वांगीण विकासासाठी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचार काळात केली. जनतेची दिशाभूल करून भाजपाने एकहाती सत्ता घेतली. आता मात्र शहरवासीयांकडे सत्ताधारी, प्रशासन व मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप आंदोलक नगरसेवकांनी केला.

यावेळी नगरसेवक दिलीप दातीर, डी. जी. सूर्यवंशी, श्याम साबळे, दीपक दातीर, राधा बेंडकोळी, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, प्रवीण तिदमे, भागवत आरोटे, प्रशांत दिवे, संतोष गायकवाड, संतोष साळवे, सुनील गोडसे, श्याम खोले, शंकर पांगरे आदी हजर होते.

उपरोधिक निवेदन

डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकनगुणिया यासह साथीच्या रोगांसाठी डासांना जबाबदार धरण्यात येवू नये, त्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. दत्तक नाशिक हे विविध रोग पसरविणारे व डासांची उत्पत्ती वाढविणारे शहर म्हणून ओळखले जावे, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असल्याचे उपरोधिक निवेदन अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले.

…तर विद्यार्थ्यांना तीन दिवसांची सुट्टी

ताप, खोकला, सर्दी असलेल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना तीन दिवस शाळेत न येण्याची मुभा देणारा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. इतर मुलांनाही त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.