किवीजवर अफगाणी हल्ला; फारुकी-राशीदच्या माऱयापुढे न्यूझीलंडचा 75 धावांतच खुर्दा

टी-20 वर्ल्ड कपमधून चौकार-षटकारांची आतषबाजी गायब असली तरी गोलंदाजांची जोरदार कमाल पाहायला मिळतेय. टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱया अफगाणिस्तानने रहमानुल्लाह गुरबाजच्या 80 धावांच्या दणक्यानंतर फझलहक फारुकी आणि कर्णधार राशीद खानच्या गोलंदाजी हल्ल्यापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अवघ्या 75 धावांतच शरणागती पत्करली. सलग दोन विजयांमुळे अफगाणिस्तानच्या ‘क’ गटातून सुपरएट प्रवेशाच्या आशा उंचावल्या आहेत. 14 जूनला पापुआ न्यू गिनीला हरवून ते सुपर -एटमध्ये प्रवेश करण्याचा इतिहासही रचू शकतात.

गुरबाज-झदरानची सलग शतकी भागी

दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या न्यूझीलंडने टॉस जिंकून अफगाणिस्तानला फलंदाजी दिली आणि गुरबाज आणि इब्राहिम झदरानने या संधीचे सोने केले. दोघांनी 14.3 षटके किवीजच्या गोलंदाजांचा सामना करत 103 धावांची सलामी दिली. युगांडाविरुद्धच्या सामन्यातही या दोघांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना 154 धावांची विक्रमी भागी रचली होती तर आजही शतकी सलामीचा विक्रम केला. गुरबाजने 5 चौकार आणि 5 षटकार खेचत 56 चेंडूंत 80 धावा चोपल्या. झदराननेही 44 धावा केल्या. पण हाणामारीच्या षटकांत वेगात धावा काढण्याच्या प्रयत्नात अफगाणिस्तानने 6 विकेट गमावत 159 अशी दमदार मजल मारली. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन विकेट टिपले.

फारुकी-राशीदने हादरवले

157 धावांचा पाठलाग न्यूझीलंडचा संघ करूच शकला नाही. फारुकीने आपल्या पहिल्याच चेंडूवर फिन ऍलनचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडचा धक्का दिला. ज्यातून ते सावरूच शकले नाही. फारुकीने आपल्या पहिल्या तिन्ही षटकांत न्यूझीलंडच्या एकेक दिग्गजाला बाद करत अफगाणिस्तानला सामन्यावर पकड मिळवून दिली. मग राशीद खानने केन विल्यमसनला बाद करत 4 बाद 33 अशी बिकट अवस्था केली. यानंतर किवीजच्या डावाला कुणीच आधार देऊ शकला नाही. फारुकीच्या धक्क्यानंतर राशीदच्या फिरकीने न्यूझीलंडची मधली फळी उद्ध्वस्त करत 16 व्या षटकांतच आपल्या दुसऱया विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केले. अफगाणने 84 धावांच्या विजयासह न्यूझीलंडचा वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा हरवण्याचा इतिहास रचला. गुरबाज ‘सामनावीर’ ठरला, पण फारुकी आणि राशीदने प्रत्येकी 4 विकेट टिपत अफगाणिस्तानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

विंडीज-न्यूझीलंडमध्ये संघर्ष

अफगाणिस्तानच्या सलग दोन विजयांमुळे त्यांच्या सुपर– एट प्रवेशाच्या आशा उंचावल्या आहेत. पण त्याचबरोबर यजमान विंडीज आणि न्यूझीलंड यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. दोघांचे प्रत्येकी तीन सामने शिल्लक असून त्यांच्यासाठी प्रत्येक विजय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे 13 जूनला न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱया लढतीतून सुपर- एटमध्ये कोणता संघ पोहोचू शकतो, याचे स्पष्ट संकेत मिळू शकतील. पण आजच्या घडीला ‘क’ गटातून अफगाणिस्तानचा सुपर-एट प्रवेश निश्चित मानला जात आहे.