आज झालेल्या दोन्ही लिंबू-टिंबू संघाच्या लढतीत स्कॉटलंड आणि कॅनडाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले. स्कॉटलंडने नामिबियाचा 5 विकेटने, तर कॅनडाने आयर्लंडचा 12 धावांनी पराभव केला.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात नामिबियाने टॉस जिंकून फलंदाजी घेतली आणि स्कॉटलंडसमोर 9 बाद 155 अशी मजल मारली. कर्णधार गेरहार्ड इरासमस (52) आणि झेन ग्रीन (28) यांनी पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागी रचली. त्यामुळे नामिबिया दीडशेचा टप्पा गाठू शकली. स्कॉटिश ब्रॅड व्हिल आणि ब्रॅड करीने 49 धावांत अर्धा संघ गारद केला. त्यानंतर 156 धावांचा पाठलाग स्कॉटलंडने कर्णधार रिची बेरिंग्टन (47) आणि मायकल लिस्कबरोबर पाचव्या विकेटसाठी केलेल्या 74 धावांच्या भागीमुळेच स्कॉटलंडला पहिला विजय नोंदविता आला.
कॅनडाने उघडले खाते
सलामीला अमेरिकेकडून पराभूत झालेल्या कॅनडाने आज कमी धावसंख्येच्या लढतीत 12 धावांनी आयर्लंडला नमवले. निकोलस कर्टन (49) आणि श्रेयस मोव्वा (37) यांनी केलेल्या 75 धावांची भागीमुळे कॅनडाने 7 बाद 137 अशी मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने 13 षटकांत 6 बाद 59 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर जॉर्ज डॉकरेल (ना. 30) आणि मार्क अडायर (34) यांनी सातव्या विकेटसाठी 62 धावांची भागी करून आयर्लंडच्या विजयाचे प्रयत्न केले, पण ते 12 धावांनी कमी पडले.