यजमान अमेरिकेने आपल्या सलामीच्या सामन्यात कॅनडाचा सहज पराभव करत विजयी सलामी दिली होती. आता त्यांची गाठ टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाशी पडतेय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सनसनाटी निर्माण करण्याची अमेरिकेला नामी संधी आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला तर ‘अ’ गटातील सारे चित्र बदलून जाऊ शकते. हीच खळबळ माजवण्याचा अमेरिकन संघाचा प्रयत्न असेल.
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान आणि अमेरिका पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. पाकिस्तानचा संघ या सामन्यासाठी हॉट फेव्हरिट असला तरी अमेरिकेला कमी लेखून चालणार नाही. अमेरिकेचा कॅनडाविरुद्धचा विजय देखणाच होता, पण आता गाठ पाकिस्तानशी आहे. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानचेच पारडे जड असणार, यात शंका नाही.
या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ सर्वात शेवटी जाहीर करण्यात आला होता. अंतिम 15 खेळाडूंची निवड जाहीर करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अत्यंत बारकाईने खेळाडूंच्या कामगिरीचे निरिक्षण केले होते. त्यांनी संभाव्य संघातील अनेक खेळाडूंना शेवटच्या क्षणी संघाबाहेर केले. त्यामुळे अमेरिकाविरुद्ध सामन्यात कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत. अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळेल, हे अनिश्चित असले तरी बाबर आझमने आपण सर्वोत्तम संघच खेळविणार असल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तानची फलंदाजी बाबर, मोहम्मद रिझवान, फखर झमान, इफ्तिखार अहमदमुळे मजबूत आहे. तसेच गोलंदाजीची धुरा शाहिन आफ्रिदी, मोहम्मद आमीर, नसीम शाह आणि हारिस रऊफमुळे घातक झालीय. मात्र या संघांकडून माजी पाकिस्तानी खेळाडूंना एकही टक्का चांगल्या कामगिरीची अपेक्षा नाही. पाकिस्तानी संघ गेल्याच पंधरवडय़ात एक सामना आयर्लंडशी तर दोन सामने इंग्लंडविरुद्ध हरला आहे. इतक्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा सोडून दिल्याचे पाकिस्तानी दिग्गज वारंवार म्हणत आहेत.
अमेरिकेचे लक्ष्य विजय
कॅनडाविरुद्ध सफाईदार विजय मिळवल्यानंतर अमेरिकन संघ जोशात आहे. एरॉन जोन्सने षटकारांची बरसात करत ठोकलेल्या 94 धावांमुळे अमेरिकेने 18 व्या षटकांतच सामना जिंकला. जोन्सने आंद्रिस गोसबरोबर 131 धावांची भागी रचत कॅनडाचा पराभव निश्चित केला होता. पाकिस्तानविरुद्धही या दोघांची बॅट तळपेल आणि अमेरिकन चाहत्यांना दमदार फलंदाजी पाहायला मिळेल. अमेरिकेने पाकिस्तानविरुद्धही विजय हेच एकमेव लक्ष्य ठेवले आहे. जर ते या लक्ष्याला गाठण्यात यशस्वी ठरले तर ‘अ’ गटाचे सारे गणितच बिघडू शकते. प्रत्येक गटात पाच संघ असले तरी अव्वल दोन संघांनाच सुपर–एटमध्ये संधी मिळणार आहे.