
यजमान ओमान संघाने टी-20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच फेरीतील ‘बी’ गटातील पहिल्याच लढतीत पीएनजी संघाला 10 गडी राखून धूळ चारली आणि महत्त्वाचे दोन गुण संपादन केले. झिशान मकसूद, बिलाल खान, कालीमुल्लाह यांची प्रभावी गोलंदाजी व अकीब इलियास सुलेहरी (नाबाद 50 धावा) व जतींदर सिंग (नाबाद 73 धावा) यांची शानदार फलंदाजी ओमानच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. 20 धावा देत 4 फलंदाज बाद करणारा कर्णधार झिशान मकसूद ‘प्लेयर ऑफ दी मॅच’ ठरला.
131 धावांची खणखणीत भागीदारी
पीएनजीकडून ओमानसमोर 130 धावांचे आव्हान उभे ठाकले. ओमानच्या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करीत हे आव्हान लीलया ओलांडले. अकीब इलियास सुलेहरी व जतींदर सिंग या दोघांनाही पीएनजीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अकीब इलियास सुलेहरी याने 43 चेंडूंत एक षटकार व पाच चौकारांसह नाबाद 50 धावांची खेळी साकारली. जतींदर सिंग याने 42 चेंडूंत चार खणखणीत षटकार व सात नेत्रदीपक चौकारांसह नाबाद 73 धावांची फटकेबाजी खेळी. दोघांच्या देदीप्यमान खेळीमुळे ओमानचा विजय सुकर झाला.
कर्णधाराचे अर्धशतक पण…
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच लढतीत दोन्ही संघांतील कर्णधारांनी आपापली भूमिका चोख बजावली. एकीकडे झिशान मकसूदने ओमानसाठी मोलाची कामगिरी केली तर दुसरीकडे अस्साद वाला याने पीएनजीचे नेतृत्व करताना 43 चेंडूंत 56 धावांची खेळी करीत पीएनजीला 20 षटकांमध्ये 129 धावा उभारून देण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. पण इतर फलंदाजांना आपली चमक दाखवता आली नाही. ओमानकडून झिशान मकसूद याने 4, बिलाल खान याने 2 व कालीमुल्लाह याने 2 बळी टिपत पीएनजीला 9 बाद 129 धावांवरच रोखले.




























































