
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या सुपर-8 लढतीत हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवला. यामुळे हिंदुस्थानपुढील आव्हान वाढलेले असतानाच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सर्वोत्कृष्ण क्षेत्ररक्षकांमध्ये गणना होणाऱ्या मोहम्मद कैफ याने अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याच्या कामगिरीवर ताशेरे ओढले आहे.
सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात दुबेची गोलंदाजी अत्यंत महागडी ठरली. दुबेने दोन षटकांत 32 धावा दिल्या आणि त्याला केवळ एक बळी मिळवता आला. कैफच्या मते 32 वर्षीय दुबेला खऱ्या अर्थाने अष्टपैलू म्हणता येणार नाही. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 3 डावांत 4 बळी घेतले आहेत, मात्र त्याचा इकॉनॉमी रेट 10.63 इतका राहिला आहे.
आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये बोलताना कैफ म्हणाला की, वेस्ट इंडिजसारख्या संघाविरुद्ध दुबे एका षटकात चार षटकारही खाऊ शकतो. ज्या पद्धतीने त्याने डेवाल्ड ब्रेविसला वाईड बॉल टाकण्याची योजना आखली, त्यावरून तो बचावात्मक खेळत असल्याचे दिसले. दहाव्या षटकात कोणीही बचावात्मक गोलंदाजी करत नाही; तिथे तुम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या मते, दुबे हा केवळ एक फलंदाज आहे, अष्टपैलू नाही, असे स्पष्ट मत कैफने व्यक्त केले.
आम्हाला अशा अष्टपैलूंची गरज नाही जो 120 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. तो एखादी विकेट घेईलही, पण तो नेहमी धावा खर्च करेल. वेस्ट इंडिजविरुद्ध तर तो एका षटकात चार षटकारही देऊ शकतो, असे कैफ म्हणाले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानी संघाचा 76 धावांनी पराभव झाला.
हरलो तरीही बेधडकच खेळणार, सूर्यकुमार यादवला आपल्या रणनीतीवर विश्वास
दरम्यान, मोहम्मद कैफने हिंदुस्थानी संघाच्या फलंदाजीच्या क्रमावरही टीका केली. हिंदुस्थानी संघात पहिल्या आठ फलंदाजांपैकी सहा जण डावखुरे आहेत, जे योग्य नसल्याचे त्याने म्हटले आहे. डाव्या-उजव्या हाताच्या फलंदाजांचे संतुलन राखण्यासाठी त्याने संजू सॅमसनला संघात घेण्याची सूचना त्याने केली.





























































