
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) दिल्लीच्या न्यायालयात सांगितले की, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा प्रमुख हाफिज सईद यांच्या वर्तमान आणि भविष्यातील दहशतवादी योजनांबद्दल हिंदुस्थानला माहिती देऊ शकतो. 28 एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्यासमोर राणाच्या ताब्यात देण्याची मागणी करताना एनआयएने हे सांगितले.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एनआयएने म्हटले आहे की, हाफिज सईद या प्रकरणात आरोपी आहे आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा अजूनही हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. संघटनेच्या कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी राणाची कोठडी आवश्यक आहे. एनआयएने म्हटले आहे की, ते राणाची प्रकृती लक्षात घेऊन योग्य पद्धतीने चौकशी करत आहेत. तर राणाने दावा केला होता की, त्यांची दररोज 20 तास चौकशी केली जात आहे. राणा सहकार्य करत नसल्याचा दावा करत एनआयएने त्याच्या ताब्यात घेण्याची मागणी केली. दरम्यान, न्यायालयाने रानाच्या कोठडीत 12 दिवसांची वाढ केली आहे.