ऑक्टोबरपासून नवी मुंबईतून टेकऑफ, मेट्रोच्या वरळी ते कफ परेड टप्प्याचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ात मुंबई दौऱयावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एक फार मोठे आंतरराष्ट्रीय फिनटेक फेस्टिव्हल 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. या फिनटेक फेस्टिव्हलमध्ये या क्षेत्राशी संबंधित जगभरातील लोक येणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान असे दोघेही येत आहेत. त्याचवेळी मोदींच्या नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचे उद्घाटन होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास केंद्र सरकार अनुकूल

नवी मुंबई विमानतळाला निश्चितपणे दि. बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे, असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारचीही अनुकूलताच आहे. याबाबतची प्रोसेस केंद्र सरकारमध्ये सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.