तलासरीजवळ वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात; 21 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तलासरीजवळील डोंगरी येथे आज संध्याकाळी वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाले. त्यात 21 जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या अपघातात सहा जण गंभीर तर 16 किरकोळ जखमी असून वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात झाल्याने लग्नात विघ्न निर्माण झाले आहे.

डहाणू तालुक्यातील आंबोली येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन टेम्पो तलासरी तालुक्यातील डोंगरी येथे जात होता. हा टेम्पो मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी उड्डाणपुलाजवळ संध्याकाळी पाचच्या सुमारास आला. त्याचवेळी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, आतील 21 जण जखमी झाले.

काही काळ वाहतूक कोंडी

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात तर गंभीर जखमींना वेदांत हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आपत्कालीन विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.