तमिळनाडूत बोअरवेलमध्ये अडकलेल्या बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्याजवळील गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षाच्या ‘सुजीत विल्सन’ या बालकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारपासून सुजीत बोअरवेलमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कामाला लागली होती. मात्र त्यास यश आले नाही. सुजीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी येथील मनाप्पराई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, सुजीतचा मृत्यू झाला आहे हे स्पष्ट होण्याआधीच एका सरकारी अधिकाऱ्याने बोअरवेलमधून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले होते. तसेच सुजीतचा मृत्यू झाला असावा त्यामुळेच कुजलेल्या मृतदेहाची ही दुर्गंधी असण्याची शक्यताही त्याने व्यक्त केली होती. तसेच आम्ही बालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यास यश आले नाही. झालेल्या घटनेबद्दल आम्हांला खेद असल्याचे परिवहन विभागाचे प्रमुख सचिव जे राधाकृष्णन यांनी सांगितले आहे.

सुजीतला वाचवण्यासाठी एनडीआरएफतर्फे बचाव मोहिम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचे कमांडर जितेश यांनी खराब हवामान, आणि सुजीत भौगौलिक परिस्थिती यामुळे सुजीतला बाहेर काढण्यासाठी विलंब लागल्याचे सांगितले.

घराजवळ असलेल्या बोअरवेलजवळ खेळत असताना सुजीत शुक्रवारी बोअरवेलमध्ये पडला. त्यावेळी तो 35 फुट खोलीवर अडकला होता. मात्र, त्याला वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे तो आणखी खोल गेला आणि आता 100 फूटांवर अडकला रविवारी संध्याकाळी 5.30 वाजेपासून तो त्या ठिकाणी अडकला होता. त्या ठिकाणी त्याला ऑक्सिजन पुरवण्यात येत होते. सुजीतला वाचवण्यासठी एनडीआरएफ व इतर सरकारी यंत्रणा मिळून 6 गट काम करत होते.