आधी लगीन कोंढाण्याचं, मग… ‘तान्हाजी’चा दुसरा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजय देवगणची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ हे तानाजी मालुसरे यांचे ऐतिहासिक उद्गार या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘तान्हाजी’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण याने तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत शरद केळकर झळकणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरला होता. तान्हाजीचे गाणे माय भवानीसुध्दा प्रेक्षकांना भावले आहे.

आता नवीन ट्रेलरमध्ये तानाजी मालुसरेंचे ते ऐतिहासिक उद्गार आहेत. ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ असं म्हणून तो ट्रेलर संपतो आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचते. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट येत्या 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.