
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईला पाणीपुरकठा करणाऱया तलावांमध्ये महत्त्वपूर्ण असलेला ‘तानसा’ तलाव आज ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. जोरदार पावसामुळे सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे सातही तलावांत मिळून १० लाख ३४ हजार ५७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला २६५ दिवसांना पुरणारा आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या ३९०० दशलक्ष लिटरमधून १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सुरू असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तीन तलावही भरून वाहू लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
– तानसा व मोडकसागर ही दोन धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. मोडकसागर धरणाचे दरवाजे उघडले असून पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू झाला आहे. मोडकसागरही ओसंडून वाहत असल्याने मोठा दिलासा मिळाला असून तानसा धरणाचेदेखील दरवाजे उघडण्यात आले आहेत.
– मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ३७ दशलक्ष एवढा जलसाठा लागतो. आतापर्यंत १० लाख ३१ हजार दशलक्ष एवढा पाणीसाठा धरणांमध्ये साठला आहे. भातसा धरणदेखील लवकरच ओव्हर फ्लो होण्याची शक्यता असून या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर तहसीलदारांनी नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.
१७ जुलै रोजी उपलब्ध पाणीसाठा
अप्पर वैतरणा – १४२२५३ (दशलक्ष लि.)
मोडक सागर -१२८९२५
तानसा-१४४७७०
मध्य वैतरणा -१६०४८१
भातसा-४२२३९८
विहार-२७६९८
तुलसी-८०४६
एकूण-१०३४५७१
मध्य वैतरणा काठोकाठ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमधील मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर आणि अप्पर वैतरणामधील पाणीसाठा महत्त्वपूर्ण ठरतो. या तीन तलावांतून मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा होतो. यामध्ये मोडक सागर १६ जुलै रोजी तर तानसा तलाव आज ओसंडून वाहू लागला. तर मध्य वैतरणा सध्या ८३ टक्क्यांवर आल्याने लवकरच ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.




























































