
सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगणा रनौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती. तसेच एका मुलाखातीत कंगणाने तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर या बी ग्रेड अभिनेत्री आहेत असा घणाघातही केला होता. त्यावर वैयक्तिक फायद्यासाठी कुणाच्या मृत्यूचा असा गैरफायदा घेणे चुकीचे असल्याचे तापसीने म्हटले आहे.
हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना तापसी म्हणाली ज्या इंडस्ट्रीने मला काम दिले, ज्यामुळे माझी ओळख मिळाली त्यावर उगाच टीका करणे चुकीचे आहे. आपल्या वैयक्तिक हितासाठी कुणाच्या मृत्यूचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे. मी असे कधीच करणार नाही. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत मी आवाज उठवला आहे. जेव्हा पती पत्नी और वो मध्ये माझ्या ऐवजी अनन्या पांडेला घेण्यात आले तेव्हा मी आवाज उठवला होता. तेव्हा दिग्दर्शकाने माझी पाठराखण केली होती. जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा लोक तुम्हाला पाठिंबा दर्शवतात असे तापसी म्हणाली.
तसेच काही चित्रपटात माझ्या ऐवजी स्टार किड्सला घेण्यात आले हे खरे असले तरी एका वर्षाला मी चार चित्रपट केले आहे. गेल्या काही वर्षात माझ्या करीअरचा ग्राफ उचांवत आहे. पण कंगणा आणि तिची बहीण रंगोली उगाच माझे नाव घेऊन वाद निर्माण करत आहेत, या दोघी एक प्रकारे माझा छळच करत आहेत असेही तापसी म्हणाली.



























































