
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
राफेल खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षांतर्गत अडचणीत आले आहेत. पवारांचे राष्ट्रवादी संस्थापक सहकारी तारिक अन्वर यांनी आज पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
राफेल विमान खरेदीप्रकरणी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर चोहोबाजूंनी हल्ला होत असताना शरद पवार यांनी मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींना क्लिन चीट देऊन सर्वांनाच राजकीयदृष्टय़ा चकित केले. राफेल खरेदी प्रकरणात मोदी यांच्याबद्दल जनतेच्या मनात शंका नाही, असे पवार म्हणाले होते.
पवार यांच्या या विधानावर नंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. पवार हे माझे गुरू आहेत. त्यांचेच बोट धरून मी राजकारणात आलो या मोदींच्या वक्तव्याचीही आठवण काहींना करून दिली आणि शिष्याच्या मदतीला गुरू धावला, अशी टीकाही झाली. आज पवारांचे राष्ट्रवादीतील संस्थापक सहकारी तारिक अन्वर यांनी थेट राजीनामाच देऊन पवारांची साथ सोडली. तारिक अन्वर यांच्या पाठोपाठ राज्य मागास वर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनीही पक्षाला रामराम ठोकला.
1990 मध्ये सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा झाल्यावर त्यांच्या परकीय राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करून पवार, पी. ए. संगमा आणि अन्वर हे तिघेजण काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादीचा उत्तर हिंदुस्थानातील चेहरा म्हणून अन्वर यांची ओळख होती. मात्र त्यांनीच पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
पवार यांचा मी सन्मान करतो, पण त्यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण -अन्वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल व्यवहारात सहभागी आहेत. त्यांना स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करता आलेले नाही. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या वक्तव्यामुळे राफेल व्यवहारात घोटाळा झाल्याचे सिद्ध होते. अशात शरद पवार यांनी केलेल्या मोदी यांच्या बचावाशी मी सहमत नाही. त्यामुळे मी पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. व्यक्तिगतरीत्या मी पवार यांचा सन्मान करतो, पण त्यांचे राफेल व्यवहाराबाबतचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असून त्याने मला धक्का बसला आहे, असे आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना तारिक अन्वर यांनी सांगितले.
आमचे वरिष्ठ सहकारी खासदार तारिक अन्वर यांनी पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीवरून त्यांनी विशिष्ट समज करून घेऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला आश्चर्य वाटत आहे– प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते




























































