
शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर सुमारे दीड वर्षाने बांगलादेशात लोकनियुक्त सरकारची स्थापना झाली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांनी आज बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना संसद भवनात तारिक रहमान यांना पदाची शपथ दिली. या समारंभाला हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित होते.
12 फेब्रुवारी रोज झालेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने 299 पैकी 212 जिंकत संपूर्ण बहुमत प्राप्त केले. त्यानंतर सोमवारी काळजीवाहू सरकाचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी राजीनामा दिला. आज बीएनपीच्या विधिमंडळ पक्षाने रहमान यांची नेतेपदी निवड केली. रहमान हे ढाका आणि बोगरा या दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. त्यापैकी त्यांनी बोगरा मतदारसंघाची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शपथविधीनंतर ओम बिर्ला यांनी रहमान यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना हिंदुस्थानात येण्याचे आमंत्रणही दिले.
एक हिंदू आणि बौद्ध मंत्र्याचाही समावेश
आज झालेल्या शपथविधीमध्ये 25 कॅबिनेट आणि 24 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात निताई रॉय चौधरी हे हिंदू आणि दीपेन देवान चकमा या बौद्ध धर्मीय मंत्र्यांचाही समावेश आहे. 25 पैकी 17 कॅबिनेट मंत्री नवे असून सर्व 24 राज्यमंत्रीदेखील नवे आहेत.




























































