देशात पुन्हा लॉकडाऊन? ‘टास्क फोर्स’ची केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज उच्चांक गाठला जात असून, मृतांची संख्याही वाढत आहे. सर्वत्र आरोग्य सुविधांचा आभाव जाणवत आहे. या स्थितीत देशव्यापी लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असतानाच केंद्र सरकारच्या ‘टास्क फोर्स’ने यासंबंधीची शिफारस केल्याचे वृत्त आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. देशभरात लॉकडाऊन हवा, असे ‘टास्क फोर्स’च्या काही तज्ञ सदस्यांचे म्हणणे असून, केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत.

व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ‘टास्क फोर्स’ स्थापन केलेला आहे. यामध्ये ‘एम्स’, ‘आयसीएमआर’मधील डॉक्टर्स, तज्ञांचा समावेश आहे. टास्क फोर्सच्या अनेक बैठका झाल्या. त्यात महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. व्ही. के. पॉल हे याबाबतचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार आहेत. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. टास्क फोर्समधील काही सदस्यांनी गेल्यावर्षीप्रमाणे देशभरात कडक लॉकडाऊनची शिफारस केली आहे. तर काहींनी निर्बंध कडक करा, असे म्हटले आहे.

संसर्ग साखळी तोडण्यासाठी तीन महत्त्वाचे सूत्र

1) दुसऱया लाटेत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झाले आहे. मोठय़ा संख्येने संसर्ग वाढला असताना कोणाकोणाला ट्रेस आणि ट्रक करणार. संपर्कातून संसर्ग वाढतो. मुळात ही संपर्क साखळी तोडायची असेल तर काही आठवडय़ांसाठी देशभरात संपूर्ण लॉकडाऊन हवा, असे टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे आहे.

2) देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. हॉस्पिटल्सबाहेर ऍम्ब्युलन्सच्या रांगा लागल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱयांनाही मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होत आहेत. डॉक्टर हतबल आहेत. डॉक्टरांमध्ये मोठा असंतोष आहे. या संसर्ग साखळीला ‘पॉज’ द्यायला हवा.

3) ग्रामीण भागात, छोटय़ा शहरांमध्ये संसर्ग वाढल्यामुळे स्थिती गंभीर आहे. ग्रामीण भागात पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत हे मान्य करायला हवे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी बिहारमध्ये ग्रामीण भागात नऊ ते दहा टक्के रुग्णसंख्या वाढली आहे.

तीन झोनमध्ये विभागणी करा

टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी देशभरात संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केल्याचेही वृत्त आहे. लॉकडाऊनमुळे गरीब स्थलांतरित मजुरांचे हाल होतात. त्याऐवजी संसर्ग रोखण्यासाठी तीन झोनमध्ये विभागणी करावी, असा पर्याय सुचविला आहे.

लो रिस्क झोन – नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण 2 टक्के असेल तेथे जास्त कठोर निर्बंध नकोत. येथे शाळा-कॉलेज सुरु करावेत. दुकाने, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, कारखाने 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवावेत. मात्र, 50 पेक्षा जास्त लोक एकत्र येतील अशा कार्यक्रमांना परवानगी नको. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हे कायम राहील.

मिडियम रिस्क झोन – नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण 2 ते 5 टक्के असेल. आयसीयू बेड वापरण्याचे प्रमाण 40 ते 80 टक्के असेल, या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात. गरीबांसाठी फूड बँकची सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या झोनमधील नागरिकांसाठी कठोर बंधने नको पण नियमावली हवी.

हॉटस्पॉट – नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 5 टक्क्याहून जास्त असेल, येथे सहा ते 10 आठवडय़ांसाठी कठोर निर्बंध लागू करावेत. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, हॉटेल्स, कारखाने, कार्यालये, धार्मिक स्थळे बंद ठेवावीत.

अनेक राज्ये लॉकडाऊन मोडमध्ये

अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. मॉल, जिम, सिनेमागृह बंद आहेत. लग्न समारंभावर निर्बंध आहेत. विकएंड लॉकडाऊन सुरू आहेत. त्यामुळे अनेक राज्ये लॉकडाऊनच्या मोडमध्ये असल्याचे दिसते. याकडेही टास्क फोर्सने लक्ष वेधले आहे.

लसीकरण वाढवा

संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण वाढविण्यावर भर दिला पाहिजे. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱया रुग्णांची, कुटुंबीयांची आणि संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करावी, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे.

पंतप्रधानांनी 20 एप्रिलला काय म्हटले? त्यानंतर काय आहे स्थिती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल रोजी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून पाहावे, असे म्हटले होते. त्यावेळी 20 एप्रिलला 24 तासांत 259170 नवे रुग्ण आढळले आणि 1761 जणांचा मृत्यू हे प्रमाण होते. आज गेल्या 24 तासांत 4 लाखांवर नवे रुग्ण आढळले आणि मृतांची संख्या 3523 वर गेली. 20 एप्रिल ते 30 एप्रिल या दहा दिवसांत रुग्णसंख्या 21.50 लाखांवरून 32 लाख झाली. मृतांची संख्या 1.82 लाखांवरून 2.11 लाखांपर्यंत वाढली याकडे ‘टास्क फोर्स’ने लक्ष वेधले आहे.