
वरळीतील स्पा सेंटरमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली होती. मयत विलेपार्ले येथे राहणारा गुरुप्पा अयप्पा वाघमारे आपल्या गर्लफ्रेंडसोबत स्पा सेंटरमध्ये गेला होता. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेहच स्पा सेंटरमध्ये आढळला. या हत्याकांडप्रकरणी स्पा सेंटरच्या मालकाला अटकही करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मयताच्या मांड्यांवरील टॅटूमुळे आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, याप्रकरणात मयत वाघमारेच्या गर्लफ्रेंडची भूमिका नेमकी काय? याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.
‘असा’ लागला मास्टरमाईंडचा शोध
पोलिसांनी जेव्हा मृतदेहाची तपासणी केली तेव्हा गुरू वाघमारे याने दोन्ही पायांच्या मांडीवर तब्बल 22 जणांची नावे गोंदवल्याचे निदर्शनास आले. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास या सर्वांची चौकशी करावी असे त्याने गोंदवून ठेवले होते. त्यात संतोष शेरेकर याचे देखील नाव होते. याशिवाय वाघमारेच्या घरातून काही डायऱ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्या डायऱ्यांमध्ये दिवसभरात जे काही करेल त्याची त्याने नोंद करून ठेवली आहे. चांगले काही झाले तर हिरव्या शाईने, घरात भांडण झाले अथवा दिवस खराब गेल्यास ते लाल शाईने तर अन्य घडामोडी निळ्या शाईने नोंदवून ठेवल्या आहेत.
पद्धतशीर हत्या पण तरीही अडकलेच
मयत गुरुप्पा हा 23 वर्षीय मैत्रीण, स्पा चा मॅनेजर आणि हेल्पर यांच्या सोबत मंगळवारी रात्री शीव येथील अपर्णा बारमध्ये पार्टीसाठी गेला होता. पार्टी केल्यानंतर ते सर्वजण वरळीच्या स्पा मध्ये गेले. दिडच्या सुमारास मॅनेजर आणि हेल्पर स्पा मधून निघून गेले. त्यानंतर दहा मिनिटांनी रेनकोट, शुज घालून दोघे तरूण स्पा मध्ये घुसले. त्या दोघांनी वाघमारे याची हत्या करून पळ काढला होता. दोघे शिताफीने तेथून सटकले. पण गुन्हे शाखेनेही शिताफीने दोघांचीही उचलबांगडी केली.
गुन्हे शाखेने शीवमधील बारपासून तपास सुरू केला. तेव्हा दोघेजण संशयास्पद हालचाल करताना बारच्या परिसरात दिसून आले. त्यातील एकाने जवळच्याच पानटपरी वर 70 रुपयांचा गुटखा देखील घेतला. त्याचे पैसे त्याने जी पे द्वारे केले. पोलीस तोच धागा पकडून तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी पर्यंत पोहचले. फिरोजचे नाव समोर येताच त्याला नालासोपारा येथून उचलण्यात आले.
तीन महिन्यांपासून रेकी, पद्धतशीर कट
वाघमारेला ठार मारण्यासाठी शेरेकरने फिरोजला सहा लाखांची सुपारी दिली होती. सुपारी मिळाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून फिरोज वाघमारेच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होता. दहा दिवसांपूर्वी फिरोजने त्याचा दिल्लीतला मित्र साकिबला या कामासाठी मुंबईत बोलावून घेतले. मग दोघांनी पद्धतशीर कट रचला.
सहा लाखांची सुपारी मिळाल्यानंतर आरोपींनी सात हजार रुपयांत एक कैची खरेदी केली. त्या कैचीचे दोन भाग करून त्याआधारे साकिबने वाघमारे याचा गळा चिरला. तर फिरोजने त्याच्यावर वार केले. काम तमाम केल्यानंतर फिरोजने दोन लाख ठेवले तर साकिबला चार लाख रुपये दिले. तसेच गुन्हा केल्यानंतर दोघे एकाच दुचाकीवरून कांदिवलीला गेले. तेथील एका स्पा मध्ये गुन्हा घडताना ओळख लपविण्यासाठी घातलेला रेनकोट, कैची, शुज आणि दुचाकी ठेवली होती. ते सर्व पोलिसांनी हस्तगत केले आहे.
कारवाईची धमकी अन् जबरदस्ती वसुलीमुळे गुरुचा गेम
मुख्य आरोपी संतोष शेरेकर याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासे केले. वाघमारे हा आरटीआयअंतर्गत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील स्पा ची माहिती मागवायचा. मग त्याआधारे संबंधित स्पा मालकाला कारवाईची धमकी देऊन जबरदस्ती वसूली करायचा. अशाच प्रकारे वाघमारे याने फिरोज याचा नालासोपारा येथील स्पा गेल्या वर्षी बंद पाडला होता. त्यानंतरही तो फिरोजला शिवीगाळ करत धमकवायचा.
शेरेकर बाबतीतही असेच व्हायचे. शेरेकरला पण त्रास देऊन त्याच्याकडून पैसे उकळायचा. वाघमारेच्या त्रासाला शेरेकर आणि फिरोज प्रचंड वैतागले होते. अखेर दोघांनी मिळून वाघमारेची कटकट कायमची संपवायची असे ठरवले. यासाठी शेरेकरने पुढाकार घेऊन फिरोजला वाघमारेच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार फिरोजने वाघमारेला कायमचे संपवले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. वाघमारे विरोधात विनयभंग, बलात्कार, खंडणी आदी आठ गुन्हे तसेच 22 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे.