
सोलापुरात पुण्यापेक्षा जास्त मिळकत कर आकारणी महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यात पुन्हा वाढीव कराची नोटीस नागरिकांना पाठवण्यात येत आहे. याला माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया यांनी विरोध केला असून, तसे पत्र पालिका आयुक्तांना त्यांनी दिले आहे. त्यावर निर्णय नाही झाल्यास महापालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सोलापूर शहरातील मिळकतींचे नूतनीकरण झाले नाही. हे करण्याचा प्रयत्न माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी केला. त्यानुसार नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली. नियमानुसार आकारणी प्रक्रिया होत नसल्याने दिलेल्या 40 हजार नोटिसा मागे घेण्यात आल्या. त्यानंतर शहरातील इमारतींची 15 टक्के भिंतीक्षेत्र सूट रद्द करून नव्याने आकारणी करण्यात येत आहे. त्यानुसार काही मिळकतींना नोटिसा देण्यात येत आहेत. ज्या इमारतीत बदल आहे त्यांचीच कर आकारणी वाढेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.वाढीव कराचे आदेश मागे घ्यावेत, असे पत्रात म्हटले आहे.
पुण्यापेक्षा सोलापुरात कर जास्त आहे. पुणे आणि सोलापूर या दोन शहरांत फरक आहे. पुण्यापेक्षा सोलापुरात जास्त कर कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुंबईत 500 स्केअर फुटाच्या घरास करात सूट दिली, पण सोलापुरात दिली नाही, असे ऍड. बेरिया म्हणाले.
सोलापूर आणि पुण्यातव्यावसायिक करामध्ये 30 टक्के तफावत असल्याचे दिसून येते. कारण, सोलापूर महापालिकेचा टॅक्स 80 टक्के असून, पुणे महापालिकेचा कर 50 टक्के आहे. त्यामुळे ही तफावत आहे. या कारणामुळे मोठमोठय़ा कंपन्या सोलापुरात ऑफिसेस भाडय़ाने घ्यायला तयार होत नाहीत. नागरिकांना पाच टक्के वाढीव कराची बिले देण्यात येत आहेत. त्यास आमचा विरोध आहे. 67 दिवस पाणी देऊन 365 दिवसांची पाणीपट्टी वसूल केली जाते. दोन दिवसांआड घंटागाडी देऊन रोजचा कर कसूल केला जातो. सोलापुरातील नागरिकांना सुविधा न देता वसुली महापालिका करत आहे.वाढीव कराचे निर्णय त्वरित मागे घ्यावेत; अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करणार असल्याची माहिती ऍड. यू. एन. बेरिया यांनी दिली.