
सामना ऑनलाईन । कल्याण
पेट्रोल पंपावरील लूट प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून पंपाबाहेरील चहावाल्यानेच लुटारूंना टीप दिल्याने साडेबारा लाखांची रोकड लुटून चोरटे पसार झाले होते. ‘टी’ देण्याऐवजी लुटारूंना टीप देणाऱया चहावाल्यासह सहा चोरटय़ांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
कल्याणच्या प्रेम ऑटो पेट्रोल पंपाचा मॅनेजर प्रदीप सिंह काही दिवसांपूर्वी 12 लाख 40 हजारांची रोकड बँकेत भरण्यासाठी जात होता. यावेळी चोरटय़ांनी त्याच्यावर हल्ला करत रोकड हिसकावून पोबारा केला. पोलिसांनी याप्रकरणी सचिन शिरोडकर, सोमनाथ ऊर्फ गणेश खंडागळे, नितीन पवार, रूपेश म्हात्रे, रोहिदास ऊर्फ सोनू सुरवसे आणि वैभव भास्कर अशा सहा आरोपींना अटक केली. तपासादरम्यान माहिती पंपाबाहेर चहा विक्री करणाऱया वैभव भास्कर यानेच पंपावरून कॅश बँकेत निघाल्याची टीप दिल्याचे उघड झाले. या गुह्यातील आरोपी सचिन शिरोडकर याच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात 8 तर बदलापूर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे असून दोन वेळा तडीपारीची कारवाई केली आहे.
चाय तयार है…
सचिन शिरोडकर हा सराईत गुन्हेगार आहे. काही दिवस त्याने पेट्रोल पंपावर रेकी केली होती. पंपाबाहेर असलेल्या वैभव भास्कर याला त्याने हेरले. किती दिवस चहा विकणार, यातून किती पैसे तुला मिळणार? त्यापेक्षा आमचे एकच काम कर तुला मालामाल करतो, असे आमिष दाखवून भास्कर याला शिरोडकरने आपल्या टोळीत घेतले. मॅनेजर एकटाच बँकेत पैसे भरायला चालला की फक्त फोनवरून टीप द्यायचे भास्करचे काम होते. त्यानुसार मॅनेजर एकटाच पैशांची बॅग घेऊन निघताच भास्करने ‘चाय तयार है’ असे फोनवरून शिरोडकरला कळवले. लुटीची टीप देण्यासाठी चाय तयार है हा कोड होता.






























































