
कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रानडे विद्यालयातील शिक्षक निसारी अहमद मोहिद्दीन मुल्ला (वय 52, रा. कापशी) हा विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी शाळा परिसरातच मुल्ला यास बेदम चोप दिला. घटनेच्या निषेधार्थ कापशी बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
शिक्षक मुल्ला याच्या विरोधात मुरगूड पोलीस स्टेशन ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे, तर शिक्षण प्रसारक मंडळाने मुल्ला याला बडतर्फ केल्याचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
न्या. रानडे विद्यालयात निसार मुल्ला हा सहायक शिक्षक म्हणून काही वर्षांपासून कार्यरत आहे. तो शाळेत मुलींशी गैरवर्तन व अश्लील शब्द वापरण्याचे प्रमाण काही महिन्यांपासून चालू होते. त्याच्या या वर्तनाबाबतच्या तक्रारी शालेय व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्याकडे केल्या होत्या. मात्र, व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी त्याच्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्याच्या वर्तनात बदल न होता प्रकार वाढतच गेले. त्यामुळे मुलींनी झालेला प्रकार पालकांस सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी शाळा आवारातच मुल्ला यास बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना शाळेच्या कार्यालयात नेण्यात आले. येथेही पालकांचा राग अनावर झाल्याने मुल्ला यास माराहाण केली. दरम्यान, दुपारपासून घटनेचा निषेध म्हणून कापशी बाजारपेठ बंद करण्यात आली.
गेल्या मागील काही वर्षांपूर्वी मुल्ला याने मुरगूड शाळेत मुलीशी गैरवर्तन करीत असल्यामुळे पालकांनी बेदाम चोप दिला होता. त्या वेळी त्याची बदली कापशी रानडे हायस्कूल येथे झाली होती. पण, येथेही मुल्ला याचे मुलींशी अश्लील वर्तन चालू होते. मात्र, तक्रार करण्यास कोणी पुढे आले नाही. आज त्याचा कहर झाला.
घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिक्षक मुल्ला यास ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा पालकांच्या तक्रारीवरून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची तीक्रता लक्षात घेता मुरगूड शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.