विद्यार्थींनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पोलीस कोठडी

सामना ऑनलाईन। खेड

अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱया रंगेल शिक्षकाला रत्नागिरी येथील न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील सुकदर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थींनीशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याने संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तालुक्यातील सुकदर जिल्हा परिषद आदर्श शाळेत शिकणाऱया सहावी व पाचवीच्या विद्यार्थीनींबरोबर शाळेतील शिक्षक सुशीलकुमार पावरा याने गैरवर्तन केले होते. शिक्षकाच्या अश्लिल कृत्याने घाबरलेल्या त्या विद्यार्थींनींनी याबाबबत पालकांकडे तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता. शाळेचे मुख्याध्यापक थोरावसे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर पालकांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली होती.

सुशिलकुमार पावरा हा शासकिय कर्मचाऱयांच्या अफ्रोट या संघटनेचा जिल्हा सचिव असल्याने आपण काहीही केले तरी आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे त्याला वाटत होते. पोलीस ठाण्यात आणल्यावरही आपले थेट मुख्यमंत्र्याशी संबध असल्याचा तो सांगत होता. पावरा याला वाचविण्यासाठी त्याच्या संघटनेत काम करणारे इतर शिक्षकानीही पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पण खेडमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन रंगेल पावरा याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत होते.

खेड पोलिसांनीही आपले कर्तव्य चोख बजावत पावरा याच्या विरोधात पोक्सो विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. त्यानंतर तात्काळ त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले. पावरा याला शनिवारी रत्नागिरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या