
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.




























































