
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एमफिलधारक शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. या शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचे सर्व लाभ देण्याच्या सूचना यूजीसीने जारी केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एमफिलधारक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षकांची मस्ट संघटना पाठपुरावा करीत होती. संघटनेच्या मागणीला अखेर यश आले असून यूजीसीने या शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचे (कॅस) लाभ देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
वर्ष 2006 ते 2009 पर्यंत सेवेत असणाऱ्या शिक्षकांनाच कॅस पदोन्नतीचा लाभ देण्यात येईल. त्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे विचित्र धोरण उच्च व तंत्रशिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी अवलंबले होते. याविरोधात न्यायालयाने निकाल देऊनही हा प्रश्न यूजीसीकडे टोलवण्यात येत होता. अखेर यूजीसीनेच याप्रकरणी खुलासा केला असून 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या आणि 14 जून 2006 पूर्वी विद्यापीठ निवड समितीद्वारे निवड झालेल्या तसेच नेट/सेटमधून सूट मिळालेल्या आणि नियमित नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांना CASचे (कॅस) म्हणजेच कालबद्ध पदोन्नतीचे सर्व लाभ देण्यात यावेत, असे यूजीसीने जाहीर पत्राद्वारे जाहीर केले आहे. या निर्णयाचे मस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार आणि महासचिव डॉ. शांतज देशभ्रतार यांनी स्वागत केले आहे.
























































