
सरकारने 14 ऑक्टोबर 2024 प्रमाणे जारी केलेल्या जीआरनुसार राज्यातील सर्व विना आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर झाला आहे, मात्र तो अद्याप दिला नसल्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा टप्पा अनुदान तातडीने द्या, अशी मागणी करत आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात 25 हजार महिला शिक्षकही सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, आंदोलनाला 10 शिक्षक आमदारांनी भेट देऊन हा प्रश्न विधान परिषदेतही उचलला असून सरकारकडे याचा पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.