
‘टीईटी’ सक्ती, संचमान्यता रद्द करा, शिक्षकांच्या नियुक्तीचे कंत्राटीकरण थांबवा, शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा लादू नका आणि रिक्त पदे तत्काळ भरा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेसह राज्यातील शिक्षक संघटनांनी उद्या 5 डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’चा नारा दिला आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आली नसल्याने मुंबईसह राज्यभरातील सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळादेखील उद्या बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(पान 1 वरून) गेल्या काही वर्षांत शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे. शिवाय टीईटी सक्तीमुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱयांवर गदा येण्याचा धोका आहे. संचमान्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त घोषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘शाळा बंद’ आंदोलन करीत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यांच्यासह राज्यातील अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणाविरोधात चेंबूर येथे सायंकाळी 4 वाजता आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारच्या शिक्षकविरोधी धोरणामुळे गोरगरीबांना शिक्षण देणाऱया शाळा बंद होतील. अनुदानित शाळांनाही फटका बसेल. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे कठीण होईल. शिक्षक अतिरिक्त ठरून त्यांची नोकरी जाईल. सरकारने याबाबत ठाम भूमिका घ्यावी. ‘टीईटी’च्या सक्तीविरोधात सरकारने पावले उचलावीत. ज. मो. अभ्यंकर, आमदार, राज्याध्यक्ष, शिक्षक सेना
एक दिवसाचा पगार कापणार
शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱयांना दिले आहेत. शिक्षण विभागाच्या या आदेशानंतर शिक्षक संघटनाही संतप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे कारण पुढे करून दिलेले हे निर्देश आंदोलन आणि आवाज दडपण्यासाठी असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला.




























































