इतिहास बदलण्याची वेळ आलीय! यजमान जगज्जेता आणि जगज्जेतेपद राखणारा संघ अशा दुहेरी विक्रमाच्या उंबरठ्यावर हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश वरवडेकर

क्रिकेटमध्ये इतिहास हा दगडावर कोरलेला नसतो, तो बॅटच्या एका फटक्याने बदलतो. विक्रम मोडण्यासाठीच बनतात आणि नवे अध्याय लिहिण्यासाठीच घडतात. टी-20 वर्ल्ड कपच्या 18 वर्षांच्या इतिहासात आजवर एकदाही यजमान संघ जगज्जेता झाला नाही. पण क्रिकेटची ही परंपरा मोडण्याचा निर्धार हिंदुस्थानने केला आहे. तुफान फॉर्म, आत्मविश्वासाचा उफाळा आणि चाहत्यांचा महासागर, या सगळय़ांच्या साक्षीने हिंदुस्थान रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहासाला नवा आकार देण्यासाठी उतरणार आहे.

अजून एक इतिहास हिंदुस्थानसमोर उभा आहे, जगज्जेतेपद राखण्याचा. टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कोणत्याही संघाला आजवर सलग दोनदा किताब जिंकता आलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानकडे आज दुहेरी संधी आहे. एकीकडे यजमान म्हणून जगज्जेता होण्याचा पराक्रम, तर दुसरीकडे गतवेळचा किताब राखत नवा अध्याय लिहिण्याचा मान. त्यामुळे हिंदुस्थानच्या हातात आज फक्त ट्रॉफी नाही, तर इतिहासाचा पेन आहे. तो इतिहास बदलूनच त्यावर आपल्या नावाची स्वाक्षरी करेल.

टी-20 ः क्रिकेटचा रॉक कॉन्सर्ट

2007 साली दक्षिण आफ्रिकेत टी-20 वर्ल्ड कपचा पहिला प्रयोग झाला. क्रिकेटच्या शांत मंदिरात अचानक ढोल-ताशे, डी.जे. आणि फटाक्यांचा स्पह्ट व्हावा तसा हा प्रकार होता. षटकारांची आतषबाजी, चौकारांची बरसात आणि शेवटच्या षटकापर्यंत धडधड वाढवणारा थरार. जगाला हा फॉरमॅट अक्षरशः वेड लावून गेला.

त्या पहिल्याच स्पर्धेत हिंदुस्थानने ट्रॉफी उचलली आणि क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. पण त्यानंतर प्रत्येक स्पर्धेत नवा नायक जन्माला आला. 2009 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत आपली कहाणी लिहिली. पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीलंकेने 2014 मध्ये हिंदुस्थानला हरवून आपले स्वप्न पूर्ण केले.

चौथ्यांदा अंतिम फेरी – हिंदुस्थानचा धडाकेबाज प्रवास

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांनी तीनदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यापैकी पाकिस्तान आणि श्रीलंका प्रत्येकी एकदा विजेते झाले, तर इंग्लंडने दोनदा ट्रॉफी उचलली. वेस्ट इंडीजचा किस्सा वेगळाच-दोनदा अंतिम फेरी आणि दोन्ही वेळा ट्रॉफी त्यांच्या नावावर. पण हिंदुस्थानने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठत सर्वांना मागे टाकले आहे. 2007 आणि 2024 मध्ये हिंदुस्थानने ट्रॉफी जिंकली, तर 2014 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता तिसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्याची संधी समोर आहे.

इंग्लंडविरुद्धची सेमी ः शुभ संकेत

गेल्या दोन स्पर्धांनी एक गमतीशीर नियम तयार केला आहे. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरी जिंकणारा संघ शेवटी वर्ल्ड कप जिंकतो.

2022 मध्ये इंग्लंडने हिंदुस्थानला हरवले आणि नंतर ट्रॉफी उचलली. 2024 मध्ये हिंदुस्थानने इंग्लंडला हरवले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला नमवत ट्रॉफी जिंकली. यावेळी पुन्हा एकदा हिंदुस्थानने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांच्या मनात आशेची नवी ठिणगी पेटलीय.

यजमानांना शाप की संधी?

क्रिकेटमध्ये काही योगायोग इतके विचित्र असतात की ते अंधश्रद्धेसारखे वाटू लागतात. टी-20 वर्ल्ड कपमध्ये यजमान संघ आजवर कधीच विजेता झाला नाही. 2012 मध्ये यजमान श्रीलंका अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती, पण वेस्ट इंडीजने त्यांचे स्वप्न मोडले.

तेव्हापासून तब्बल 13 वर्षांनी यजमान पुन्हा अंतिम फेरीत पोहोचलेत आणि तो यजमान म्हणजे हिंदुस्थान. लाखो प्रेक्षकांचा गजर, निळय़ा जर्सींचा समुद्र आणि मोदी स्टेडियमचा प्रचंड गडगडाट या सगळय़ांच्या साक्षीने हिंदुस्थान रविवारी त्या शापाला आव्हान देणार आहे.

हरूनही अंतिम फेरीत ः क्रिकेटची करामत

क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. सात विजय मिळवत धावणारा दक्षिण आफ्रिका संघ आठव्या सामन्यात हरला आणि स्पर्धेबाहेर गेला. दुसरीकडे इंग्लंडने सुपर एटमध्ये तिन्ही सामने जिंकले, पण ते उपांत्य फेरीत हरले.

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सुपर एटमध्ये एकेक सामना गमावला, तरीही अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडने तर साखळी फेरीतही पराभव पत्करला होता. पण उपांत्य फेरीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा केलेला धुव्वा पाहून क्रिकेटविश्वच थक्क झाले.

आता या दोन संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. इतिहास, विक्रम, योगायोग आणि स्वप्न, या सगळय़ांची  मोदी स्टेडियमवर अंतिम परीक्षा असेल. पेपर सोपा जातोय की कठीण ते उद्या कळेल.