
टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज करण्याच्या उंबारठयावर आहे. असे असताना दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंगने एक गुगली टाकली. वन डे आणि टी-20 संघांसाठी जसे दोन कर्णधार असतात तसेच टीम इंडियाला दोन प्रशिक्षक असायला हवे, असे परखड मत व्यक्त करीत भज्जीने टीम इंडियातील बदलाबाबत मोठी मागणी केली आहे. हरभजन सिंग म्हणाला, ‘कसोटी आणि वन डेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे, तर हार्दिक पंडय़ाकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. जेव्हा संघात दोन कर्णधार असू शकतात तेव्हा दोन प्रशिक्षक असायला काय हरकत आहे? म्हणजे राहुल द्रविड यांच्याऐवजी टी-20 क्रिकेटबद्दल अधिक जाण असलेल्या व्यक्तीला प्रशिक्षक करावे, अशी थेट मागणी भज्जीने केली आहे. ‘समजा आशीष नेहरा किंवा वीरेंद्र सेहवागला टी-20 संघाचे प्रशिक्षक केले तर ते क्रिकेटच्या या छोटय़ा प्रकारावरच लक्ष्य केंद्रित करतील. द्रविडकडे कसोटी व एकदिवसीय संघाची जबाबदारी ठेवली तर त्यांनाही क्रिकेटच्या या प्रकारात संघाला जिंकण्यासाठी योजना आखणे थोडे सोपे होईल,’ असे स्पष्टीकरण हरभजनने आपल्या मताबाबत दिले आहे.























































