
ओव्हलवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत राखल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी जल्लोषाऐवजी शांततेत इंग्लंडचा निरोप घेतला. मंगळवारी सकाळी संघातील बहुतांश खेळाडू एमिरेट्सच्या विमानाने स्वदेशाकडे रवाना झाले आणि रात्री उशिरा आपापल्याला शहरात दाखलही झाले. शेवटच्या कसोटीत निर्णायक भूमिका बजावलेल्या मोहम्मद सिराजसह अर्शदीप सिंग व शार्दुल ठाकूर हे खेळाडूही परतीच्या प्रवासात सहभागी होते. सिराज दुबईमार्गे हैदराबादला, तर अन्य खेळाडू त्यांच्या मूळगावी पोहोचतील. काही खेळाडूंनी मात्र इंग्लंडमध्येच थोडा विश्रांतीचा वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील एकही सामना न खेळलेल्या कुलदीप यादवला माजी खेळाडू पियूष चावलासोबत लंडनमध्ये फिरताना पाहण्यात आले. तसेच अर्शदीप आणि प्रसिध कृष्णा हे काही खेळाडू लंडनच्या मध्यवर्ती भागात कुटुंबासमवेत वेळ घालवताना दिसले. कामाच्या ओझ्याच्या व्यवस्थापनामुळे जसप्रीत बुमराला अंतिम कसोटीत विश्रांती देण्यात आली होती.