
टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीत अपराजित असलेला हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीही थाटात गाठणार, अशी एकमुखी भविष्यवाणी हिंदुस्थानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्तवल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. म्हणजेच सुपर एटमध्येही हिंदुस्थान विजयाची हॅटट्रिक नोंदवणार असे साऱ्यांचेच म्हणणे आहे.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघच जगज्जेतेपदाचा अस्सल दावेदार असल्याचे मत साऱयाच क्रिकेटपटूंनी आजवर वर्तवलेय. त्याच स्पर्धेचा दुसरा दावेदार असलेला ऑस्ट्रेलियन संघ साखळीतच गारद झाल्याने हिंदुस्थानच्या जगज्जेतेपद राखण्याच्या मोहिमेतील एक अडथळा आपोआप दूर झाला आहे. चेतेश्वर पुजारापासून युजवेंद्र चहलपर्यंत सर्वांचाच हिंदुस्थानवर विश्वास आहे.
महान कसोटीपटू चेतेश्वर पुजारानुसार हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. मोहम्मद पैफने या यादीत श्रीलंकेऐवजी इंग्लंडला पसंती दिली आहे. उर्वरित तीन संघ पुजारासारखेच आहेत. युजवेंद्र चहलची पसंती पैफसारखीच आहे. माजी यष्टिरक्षक सबा करीमने हिंदुस्थानसह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांना उपांत्य फेरीसाठी पसंती दिली आहे.
पाकिस्तानला नापसंती
क्रिकेट दिग्गजांच्या यादीत उपांत्य फेरीसाठी हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ टॉपवर आहेत. मात्र पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठेल, असे पुणालाही वाटत नाही. त्यामुळे दिग्गजांनी वर्तवलेल्या अंदाजात पाकिस्तान पुठेच दिसत नाहीय. या क्रिकेटपटूंचे अंदाज किती अचूक ठरतात, ते पुढील आठवडाभरात कळेलच.
दडपण की संधी?
सर्व माजी दिग्गजांनी एकमुखाने दाखवलेला विश्वास आता हिंदुस्थानी संघासाठी प्रेरणादायी ठरणार की अतिरिक्त दडपण निर्माण करणार, हे येणाऱया सामन्यांत स्पष्ट होईल. मात्र क्रिकेटविश्वाचा काwल हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणारच असा आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकात्यात होणाऱया लढतीकडे साऱयांचे लक्ष वेधले गेले आहे.
मुंबईकरांनो सज्ज व्हा
दिग्गजांच्या एकमुखी भविष्यवाणीनंतर सर्वांचा एकच आवाज आहे, मुंबईकरांनो, उपांत्य फेरीसाठी सज्ज व्हा. कारण जगज्जेतेपद राखण्याच्या दिशेने जोरदार पाऊल मुंबईतच टाकले जाणार आहे. याचाच अर्थ भविष्यवाणीनुसार सुपर एट गटात अव्वल राहणारा हिंदुस्थान आपला सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळणार हेसुद्धा सत्यात उतरण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी दिग्गजांच्या यादीत पाकिस्तान नसल्यामुळे हिंदुस्थानला त्यांच्याशी भिडावेच लागणार नाही. मात्र अंदाज चुकले आणि पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आणि योगायोगाने तो सामना हिंदुस्थानविरुद्धच असेल तर हा थरार कोलंबोत खेळविला जाणार आहे. जर हिंदुस्थान आणि पाकिस्तान आपापल्या गटात एकाच क्रमांकावर राहिले तर हिंदुस्थान वानखेडेवर उपांत्य सामना खेळेल आणि पाकिस्तानची लढत कोलंबोत होईल. मात्र दोघांचे स्थान क्रॉस झाले तर वानखेडेवर अन्य संघांचा उपांत्य सामना खेळविला जाईल.






























































