
श्री मावळी मंडळ संस्थेच्या 101 व्या शिवजयंती उत्सवानिमित्त 73 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला 14 एप्रिलपासून दमदार प्रारंभ होत आहे. यंदा पुरुष गटात 71 तर महिला गटात 39 संघ सहभागी होत असून शंभरहून अधिक संघांचा ‘दम’ पुन्हा ठाण्यात घुमणार आहे.
बाद पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी पुरुषांची 4 व महिलांची 2 अशी एकूण 6 क्रीडांगणे सज्ज आहेत. प्रेक्षकांसाठी खास गॅलरी उभारण्यात आल्याने सामन्यांचा थरार रंगतदार होणार आहे. पुणे, धुळे, नांदेड, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगरातील नामांकित संघ सहभागी होत आहेत. गतविजेते स्वस्तिक क्रीडा मंडळ (पुरुष) आणि डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (महिला) यांच्याकडे विशेष लक्ष राहील.
या स्पर्धेची खास बाब म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिला गटालाही समान पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विजेत्यांना रोख रु. 51,000 तर उपविजेत्यांना रु. 31,000 आणि उपांत्य फेरीतील संघांना रु. 11,000 देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट खेळाडूंनाही रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.



























































