फ्रेशर्स पार्टीनंतर रुममध्ये येऊन झोपला, सकाळी TISS च्या विद्यार्थ्याचा मृतदेहच आढळला

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा राहत्या खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनुराग जैस्वाल असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा लखनऊ येथील रहिवासी आहे. अनुराग TISS मध्ये मानव संसाधन विषयात पदवी घेत होता.

शुक्रवारी रात्री वाशी येथील एका हॉटेलमध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सुमारे 150 मित्रांसोबत अनुराग सहभागी झाला होता. पार्टीमध्ये अनुरागने मद्यप्राशनही केले. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास तो आपल्या भाड्याच्या कोलीत परतल्याचे त्याच्या रुम पार्टनर्सनी सांगितले.

सकाळी बराच वेळ झाला तरी अनुराग उठत नव्हता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला चेंबूरमधील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनुरागच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून अनुरागच्या तीन रूममेट्सचीही चौकशी सुरू आहे.

अनुरागच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा मारहाणीच्या खुणा नाहीत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अनुरागच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. तसेच पार्टीत सहभागी झालेल्या इतर तरुणांचेही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे डीसीपी हेमराज राजपूत म्हणाले.