तेजस ठाकरे यांनी शोधला नव्या प्रजातीचा साप, नाव मिळाले ‘ठाकरे कॅट स्नेक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tejas-thackeray-new-research

राज्याच्या पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये एक अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा साप सापडला आहे. या सापाचा शोध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी लावला असून त्यांनी या सापाबाबत केलेल्या अथक संशोधनामुळे या सापाच्या प्रजातीला ‘ठाकरे कॅट स्नेक’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, शास्त्रीय भाषेत या सापाला बोईगा ठाकेरायी असे नाव देण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात या सापाबाबतचे संशोधन केले जात होते. जैवविविधता संरक्षण संस्थेच्या वरद गिरी यांनी या सापाबाबत सांगितले की, हा कॅट स्नेक या गटात मोडणारा आहे. या प्रजातीचे साप देशाच्या विविध भागांत सापडतात.  मात्र पश्चिम घाटात या प्रजातीचे साप अत्यंत दुर्मिळ आहेत. बीएनएचएस अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याचेही ते म्हणाले. तेजस ठाकरे यांचे मोठे बंधू शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून तेजस ठाकरे यांच्या संशोधनाबाबतची माहिती दिली.

संशोधन 2015 पासून
तेजस ठाकरे 2015 पासून या सापाबाबतचे संशोधन करत आहेत. त्यांनी संशोधनाचा तपशील जैवविविधता संरक्षण संस्थेसमोर मांडला होता. त्यांच्या संशोधनामुळे या सापाबाबत आणखी जाणून घेता येणार असल्याचे गिरी यांनी सांगितले. 125 वर्षांत पहिल्यांदाच पश्चिम घाटात या सापाचा शोध लावण्यात आला आहे. हा साप रात्रीच्या वेळी अधिक चपळ असतो. त्याची प्रजाती विषारी नसून त्याची लांबी 3 फुटांपर्यंत असू शकते.