10 तासांची शिफ्ट आठवड्याला 47 तास काम, तेलंगणा सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी नियम

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शिफ्टचा कालावधी आठ तासांचा असतो. तेलंगणा सरकारने मात्र कर्मचाऱ्यांच्या शिफ्टसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने कमर्शियल ठिकाणी म्हणजे व्यावसायिक युनिट्ससाठी दहा तास काम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचसोबत पूर्ण आठवड्यात 48 तास काम करण्याची लिमिट सेट केली आहे. सरकारने यासंदर्भात 5 जुलै रोजी आदेश जारी केले आहेत. दुकाने आणि मॉल्सला यातून वगळण्यात आले आहे.

दिवसाला दहा तास काम

तेलंगणा सरकारने राज्यातील कामकाज अधिक सोपे व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानुसार व्यावसायिक क्षेत्रातील कामाचे तास दहा तासांपेक्षा जास्त नसावेत आणि आठवड्यांच्या तासांची मर्यादा 48 तास असावी. याचसोबत यापेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम दिला जाईल.

सहा तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक

तेलंगणा सरकारच्या नियमांनुसार, जर दहा तासांपेक्षा जास्त काम केले तर ओव्हरटाइम मिळणार आहे. ओव्हटाइम पकडूनदेखील कामाचे तास 12 तासांपेक्षा जास्त नसावेत. याचसोबत दर सहा तासांनी कर्मचाऱ्यांना 30 मिनिटांचा ब्रेक देणे आवश्यक आहे. हा आदेश 8 जुलैपासून लागू करण्यात येईल.