हैदराबादला पावसाने झोडपले; दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवारी आंध्र प्रदेशच्या हैदराबाद आणि परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात अनेक भागात पाणी साचले असून शहर जलमय झाले आहे. त्याचा वाहतुकीलाही फटका बसला आहे. या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उस्मानिया युनिवर्सिटी आणि जवाहरलाल नेहरू टेक्निकल युनिवर्सिटीने पावसामुळे परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाचा तेलंगणा आणि हैदराबाद राज्यांना मोठ्या फटका बसला असून या राज्यात पावसाने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. बदलागुडामध्ये मोहम्मदिया हिल्स भागात भिंत कोसळल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. तर इब्राहिमपट्टनम भागात घराचे छत कोसळल्याने 40 वर्षांची महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला. शहरात रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.

तेलंगणा आणि हैदराबादमध्ये सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हैदराबाद शहरासह राज्याच्या अनेक भागात पाणी साचले आहे. हैदराबादच्या अट्टापूर रोड, मुशीराबाद, टोली चौकी आणि दम्मीगुडा भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीला त्याचा फटका बसला. सखल भागात पाणी शिरलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. एसडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहे. हैदराबाद शहरात 24 तासात 20 सेमी पाऊस झाला आहे. तर एल.बी. नगरमध्ये 24 तासात 25 सेमी पाऊस झाला आहे. राज्यात बुधवारीही पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.