गेल्या महिन्यात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन दर वाढवले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला भार पडला. रिचार्जचे दर कमी होतील का, या आशेवर ग्राहक होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण ट्रायने टेलिकॉम कंपन्यांकडून पूर्वीसारखे व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस पॅक लाँच करण्यासंदर्भात सूचना मागवल्या होत्या. त्यावर जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपन्यांनी नुकतेच आपले म्हणणे मांडले. सध्याचे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या विभिन्न गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे वेगळे व्हॉईस आणि एसएमएस असे प्लॅन्स लाँच करण्याची गरज नाही, असे या कंपन्यांनी ट्रायला कळवले आहेत. यावरून टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन्सचे दर कमी करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, हेच दिसून येते. जिओ, एअरटेल आणि व्हीआयने ट्रायला कळवलेय की, आमचे रिचार्ज प्लॅन अशा पद्धतीने तयार करण्यात आलेत की, युजर्सला वेगळा प्लॅन खरेदी करण्याची गरज नाही. टेलिकॉम कंपन्यांच्या मते, त्यांना आता वेगळे व्हॉईस आणि एसएमएस असे प्लॅन्स लाँच करण्याची गरज नाही. अनलिमिटेड डेटा आणि वॉईस कॉलिंगच्या मदतीने युजर्सला चांगला अनुभव मिळत आहे.