“आपल्या उपास्यदेवतेची आज्ञा झाल्यावाचून आपण कोठेही जात नाही!”

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

श्री स्वामी महाराजांना ब्रह्मावर्त येथे येऊन एक वर्ष होऊन गेले. 1825 च्या आषाढ महिन्यात श्रीगुरुपौर्णिमेचा उत्सव संपल्यावर चातुर्मास येथेच करायचे असे त्यांनी ठरवले. श्रीस्वामी महाराजांच्या कीर्तीचा सौरभ काशी, प्रयाग वैगरे क्षेत्रांपर्यंत पसरला होता.

श्रीस्वामी महाराजांच्या संगतीचा लाभ मिळावा म्हणून, तेथील विद्वान मंडळींनी काशीला येण्याविषयी आग्रहाची पत्रे त्यांना पाठविली. पांत. “आपल्या उपास्यदेवतेची आज्ञा झाल्यावाचून आपण कोठेही जात नाही!” अशी उत्तरे श्रीस्वामी महाराजांनी सर्वांना पाठविली. त्या वेळी काशीचे एक अधिकारी संन्यासी प. प. शांताश्रम स्वामी महाराज, यांना श्रीस्वामी महाराजांच्या भेटीची विलक्षण तळमळ लागली होती म्हणून ते स्वतःच काशीहून ब्रह्मावर्ताला आले.

श्री शांताश्रम स्वामी महाराजांना त्यांच्या सद्गुरूमहाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी संन्यास दीक्षा दिली होती व त्यांना श्रीमद भागवताची पोथी देऊन, त्याचे अखंड सप्ताह करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी श्रीमद भागवताचे चाळीस वर्षे अखंड सप्ताह केले.

त्यांनी केलेल्या ह्या प्रगाढ उपासनेमुळे भगवान श्रीगोपालकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. त्यांच्या मुखाने प्रत्यक्ष भगवान श्रीगोपालकृष्णच बोलत असत. त्यामुळे त्यांच्या तोंडून श्रीमद भागवत ऐकणे, म्हणजे सर्वांना आनंदाची पर्वणीच होती. श्री शांताश्रम स्वामी महाराजांना रोज पहाटे हाक मारून उठविण्यापासून त्यांची सर्व देखभाल स्वतः भगवान श्रीकृष्ण करीत असत.

श्री शांताश्रम स्वामी महाराज ब्रह्मावर्ताला श्रीराम मंदिरात येऊन पोहोचले, त्या वेळी श्रीस्वामी महाराजांचे अध्यापन चालू होते. त्यांची अध्यापन करण्याची पद्धत पाहून श्री. शांताश्रम स्वामींनी खूप आनंद झाला. पाठ चालू असतानाच दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्याही नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. बराच वेळ ते दृष्टीने एकमेकांशी बोलत होते. मग थोड्या वेळाने उठून श्री स्वामी महाराजांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. दोघानाही एकमेकांच्या सहवासात आनंद वाटत होता. श्री. शांताश्रम स्वामींचे त्यावेळी चार महिने राहणे ब्रह्मवार्तास झाले.

आपली प्रतिक्रिया द्या