
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर अक्षरश: उकडून निघाले आहेत. आज तर या उकाडय़ाने कहरच केला. कडक उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा अशा प्रचंड हॉट माऱयाने मुंबईकर हैराण झाले. मुंबईत 37 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. त्यामुळे आजचा दिवस गेल्या तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातला सर्वात तप्त दिवस ठरला.
राजस्थान आणि गुजरातमध्ये तापमान तब्बल 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. तेथील उष्ण वारे मुंबईत धडकले असून त्यामुळे मुंबईचा पारा चढल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रावर हवेचा प्रचंड दबाव तयार झाला आहे. हवा जमिनीलगत वाहत असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाणही वाढले असून पुढचे तीन दिवस हा पारा चढलेला राहणार असल्यामुळे मुंबईकरांचा घामटा निघणार आहे.
चक्रीवादळाचाही धोका
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ ओमानकडे सरकण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
– मुंबईत हवामान कोरडे राहणार
– कोकण-गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता
– मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा ताप आणखी वाढण्याचा अंदाज
पावसाचा काढता पाय
मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडय़ासह संपूर्ण राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे. हवामान खात्याने तशी अधिकृत घोषणा केली आहे. नैऋत्य मोसमी पावसाने 6 ऑक्टोबरपासून आपला गाशा गुंडाळला आहे. पाण्याची तूट शिल्लक ठेवून पावसाने निरोप घेतल्यामुळे संपूर्ण राज्याला पाण्याच्या चिंतेने ग्रासले आहे. पहिले दोन महिने मुसळधार कोसळून आपला कोटा पूर्ण केलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये ओढ दिली. धरणांचा पाणीसाठा पूर्ण झालेला नसताना पावसाने या वर्षीसाठी निरोप घेतला आहे. मोसमी पाऊस आता देशातून ‘विड्रॉ’ झाला असल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने केली आहे. आता विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, अरबी समुद्र आणि मुंबईतून मोसमी पावसाने ‘एक्झिट’ घेतली आहे.
गेल्या तीन वर्षांतले तापमान
वर्ष- तारीख- तापमान
2017- 27 – 36.6
2016 – 21 – 35.5
2015 – 17 – 38.6
























































