
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांच्या जोरबैठका वाढल्या आहेत. वातावरण चांगलेच गरम आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केवळ ही गरमागरमीच नाही तर प्रत्यक्षात पाराही चांगलाच चढणार आहे. कारण तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सियसने वाढेल असा हवामानतज्ञांचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 23 एप्रिल रोजी जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, रायगड, पुणे, बारामतीसह नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी मतदान होत आहे. या सर्वच भागांत तापमान 42 ते 44 डिग्री सेल्सियस राहील असा अंदाज राज्याच्या कृषी विभागाचे माजी सल्लागार आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला, तर 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरीसह नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये मतदान होत आहे. मुंबईत 40 ते 41 डिग्री सेल्सियस इतके तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना मतदान करण्यासाठी बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे. धुळे, नंदुरबार, मावळचा पाराही चाळिशी पार असणार आहे. प्रचारसभा आणि चौकसभांमध्ये उमेदवार, कार्यकर्ते, मतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे.
या ठिकाणी पारा भाजून काढणार
रायगडाचे भिरा, धुळे, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी तापमान प्रचंड असेल तर ठाणे आणि रायगडमध्ये पारा चढाच राहील. मुंबईत तापमान आणि आर्द्रता अशा दोन गोष्टींचा सामना मतदारांना करावा लागणार आहे.
कशामुळे वाढणार तापमान?
- हवामान कोरडे राहणार. हवेचा दाब वाढणार तसेच सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार. या दोन गोष्टींमुळे महाराष्ट्रात तापमान वाढेल असा अंदाज डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.
- येणाऱ्या काळात तापमान आणखी वाढणार असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढेल.
- जनावरांच्या चारा छावण्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार.
- पाणी जपून वापरावे लागेल. अनेक भागांत जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने निवडणूक काळात पाण्याचेही टेन्शन राहणार.




























































