आभाळमाया : पृथ्वीला ताप आलाय

>>वैश्विक<<

मे महिन्याचा मध्यकाळ म्हणजे मी म्हणणारा उन्हाळा! पृथ्वीवर उत्तर गोलार्धात सध्या सूर्य तळपत आहे. वास्तविक दक्षिणायनाच्या काळात म्हणजे सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावर असताना पृथ्वी सूर्याच्या अधिक जवळ असते आणि आता उत्तरायणाच्या काळात जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा काहीशी दूर असते. यालाच पृथ्वीचं उपसूर्य आणि अपसूर्य असं सूर्याभोवतीचं लंबवर्तुळाकार भ्रमण कारणीभूत असतं. आजमितीला पृथ्वी अपसूर्य म्हणजे सूर्यापासून काहीशी दूर आहे. मग एवढा ‘सन’ताप आपल्याला का जाणवतोय? पृथ्वीचं सूर्याजवळ असणं आणि दूर असणं यात सुमारे 50 लाख किलोमीटरचा फरक असला तरी शेवटी सूर्य तो सूर्यच. दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या साडेतेवीस अंशांनी कललेल्या अक्षामुळे जे ऋतुचक्र निर्माण होतं त्यात सूर्याचं भासमान भ्रमण दक्षिणोत्तर जाणवतं.

आपल्या महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर सूर्य आता अगदी आपल्या डोक्यावर आहे. म्हणजे सावली पायाखाली येण्याचा काळ. असं आपल्याकडे वर्षातून दोनवेळा घडतं मे आणि जुलैमध्ये. मे महिन्यात सूर्याचं उत्तरायण अर्ध्याहून अधिक होतं. मुंबई-महाराष्ट्र पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात 19 ते 20 अंशांवर आहे. पुढे साडेतेवीस अंशांपर्यंत म्हणजे उज्जैनपर्यंत सूर्य ‘वर’ सरकेल. दिल्लीत तो आपल्याकडे येतो तसा कधीच बरोबर डोक्यावर येत नाही. तर सहस्ररश्मी किंवा हजार किरणांचा तारा मानल्या गेलेल्या सूर्याची प्रखर किरणं खरं तर अगणित आहेत. सूर्य-पृथ्वीचं नातं साडेचार अब्ज वर्षांचं आहे. याचाच अर्थ हा उन्हाळा काही नवा नाही. शेकडो वर्षांपूर्वी तो तसाच होता आणि पुढेही तसाच राहणार आहे.

मग वाढती उष्णता आली कुठून? ती काही अंशी ग्लोबल वॉर्मिंगमधून तीनेकशे वर्षांपूर्वी पृथ्वीवरची मानवी लोकसंख्या केवळ काही कोटींच्या घरात होती. 1600 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या 10 कोटींच्या आसपास होती असं म्हटलं जातं. पुढे 300 वर्षांत ती 30 कोटी आणि नंतरच्या 70 वर्षांत सव्वाशे कोटी झाली. तोच प्रकार जगाचा. जगाची लोकसंख्या सात अब्जांचा आकडा पार करून गेलीय. याचा अर्थ असा की, या वाढत्या मानवसंख्येने पृथ्वीवरच्या जंगलांचा फार मोठा घास घेतलाय आणि त्याचबरोबर भूगर्भातले पाणीसाठेही रिक्त करण्याचा चंग बांधलाय. इतर कोणतेही प्राणी या दोन्ही गोष्टी करीत नाहीत. त्यामुळे भूजलाने येणारा थंडावा गमावून आणि दुष्काळामुळे आकाशातून पडणाऱ्या पाण्याचं प्रमाण घटून आपण प्रखर उन्हाळय़ाचा सामना करीत आहोत. काही स्वयंसेवी संस्था याच उन्हाळय़ात खेडोपाडय़ात जाऊन जलभरणाची तयारी करतात. तसे प्रयोग उत्तमच आहेत. परंतु पावसाचं चुकलेलं किंवा बिघडलेलं वेळापत्रक शेतकऱ्याला हवालदिल करतंय. भांडंभर पाण्यासाठी शंभर फूट विहिरीचा तळ गाठण्याची कसरत अनेकांना करावी लागतेय. हे सारं बदलेलं ते माणसाच्याच निर्धारातून.

निसर्ग त्याचं काम निर्हेतुकतेने करीत असतो. त्याच्या तंत्रात खोडा घातला तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. खगोलीय घटनेनुसार सूर्याची तप्त किरणे थेट डोक्यावर येत असल्याने भयंकर उन्हाळा जाणवतोय. शहरी भागात काँक्रीटच्या इमारती तापून उष्णता वाढते. याच पार्श्वभूमीवर ‘नासा’चा एक अहवाल बघायला हवा. गेल्या 15 वर्षांत पृथ्वीचा पृष्ठभाग अधिकाधिक तापतोय असा त्याचा निष्कर्ष आहे. ‘ऍटमॉस्फिअरिक इफ्रारेड साउन्डर’ या उपग्रहातील यंत्रणेद्वारे 2003 ते 2017 या काळातलं पृथ्वीच्या त्वचेचं म्हणजे पृष्ठभागाचं तापमान बारकाईने तपासण्यात आलं तेव्हा त्यातून पृथ्वीचं पृष्ठभागावरील तापमान वाढल्याचं लक्षात आलं. त्यातही 2015 पासून उष्णतावाढ होतच असल्याचं दिसून येतंय. एकूण काय सूर्य आग ओकतोय असं आपण म्हणतोच. तसा पृथ्वीलाही ताप येतोय. याची कारणं शोधून वेळीच उपाय करायला हवा. आपलं घर थंड करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणंसुद्धा शेवटी ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये भरच घालतात हेही सिद्ध झालंय. तेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे.

आपण दरवर्षी म्हणतो ‘यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे.’ मग हायहुय करण्यात दिवस निघून जातात. पावसाळा आला की आपण सारं विसरतो. उन्हाळय़ानंतर सुदैवाने चांगला पाऊस झाला तर तो साठवण्याचा आणि आपल्या भागातला भूजलसाठा वाढवून भूभाग शांतवण्याचा प्रयत्न आताच करायला हवा. अन्यथा अनेक कारणांनी वाढणारं पृथ्वीचं तापमान शेवटी आपल्यालाच तापदायक ठरणार आहे. उन्हात उभं राहिल्यावर आपली सावली पायाखाली येऊन पायाला चटके बसतायत. त्यासाठी डेरेदार झाडांच्या सावलीची व्यवस्था वेगाने करायला हवी. शेकडो वर्षे टिकणारी झाडं लावायला हवीत. ती पावसाचं पाणी खोल मुळांद्वारे जमिनीत नेतील आणि आपल्याला घनदाट छायाही देतील. निसर्गाची लहर फिरली असली तरी त्या परिस्थितीशी जुळवून मार्ग काढण्याची बुद्धी माणसाकडे आहेच. फक्त या बुद्धीचा वापर वेळेवर व्हायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या