विदर्भाची झाली भट्टी, चंद्रपूर 46.6 अंशावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट चांगलीच पसरली असून आज राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 46.6, तर ब्रह्मपुरी 46.5 अंश सेल्सिअस अशी नोंदविण्यात आली आहे. पारा 47 अंशापर्यंत पोहोचल्यामुळे वैदर्भीयन हैराण झाले आहे. तर हवामान खात्याने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर येथे वादळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. उष्मघाताने नागपुरात दोघांचा मृत्यू झाला.

जगात चंद्रपूर आणि ब्रह्मपूरी, वर्धा ही हॉट शहरे असल्याचे जाहीर झाले आहे. विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि ब्रह्मपूरी, वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. 30 मे पर्यंत उष्णतेची लाट अशीच कामय राहणार असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. 25 मे पासून नवतपाला सुरुवात होत असून 9 दिवस विदर्भातील जनतेला उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. आज सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 46.6, तर त्या खालोखाल ब्रह्मपूरी 46.5 अशी नोंदविण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भच आज 40 अंशाच्या वर असल्यामुळे उष्णतेची भीषणता किती असेल हे दिसून येते.
अकोला 45.2, अमरावती 45, बुलडाणा 43, ब्रह्मपूरी 46.5, चंद्रपूर 46.6, गडचिरोली 44.2, गोंदिया 43.5, नागपूर 45.6, वर्धा 46.4, वाशिम 43, यवतमाळ 44.5 अंश सेल्सिअस अशी नोंदविण्यात आली आहे.

उष्माघाताने दोघांचा मृत्यू
नागपूर शहरात सूर्य आग ओकत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱया भिक्षेकरींना मोठा फटका बसला आहे. धंतोली परिसरातील लोखंडी पुलाखाली 50 ते 55 वर्ष वयाच्या एका अज्ञात व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर दुसरी घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिहानसमोरील एम्स हॉस्पिलटसमोर घडली. 35 ते 40 वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा झाडाखाली मृत्यू झाला. यात दोन्ही घटनेत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.