राज्यात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात कोकणवगळता सर्वच ठिकाणी उष्णतेच्या झळा बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. उन्हाचे चटके आणि उकाडय़ाने नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट वाढत आहे. विदर्भातील तापमानाने उच्च्चांकी पातळी गाठली आहे. राज्यात कोरडे हवामान असल्याने तापमानात झपाटय़ाने वाढ होत आहे. शनिवारी अकोल्यामध्ये राज्यातील उच्चांकी 46.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आणखी दोन ते तीन दिवस तापमानवाढ आणि उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या मध्य प्रदेश ते कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थान परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणाम देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हवामानावर झाला आहे.राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागासह विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही उष्णतेच्या झळा बसत आहेत. विदर्भात पारा 43 अंशांच्या पुढे गेला आहे. अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी ठिकाणी पारा 45 ते 46 अंशांवर गेला आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमान 43 ते 44 अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रात नगर, जळगावचा पारा 45 अंशांपुढे, तर पुण्यातही 42.9 अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 10 वर्षातील हे उच्चांकी तापमान आहे. सरासरीच्या तुलनेत तापमान तीन ते चार अंशांनी वाढले आहे. आणखी दोन दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर राज्यात पावसाळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून तापमान झपाटय़ाने वाढत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 41 ते 46 अंशांवर गेला आहे. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल 3 ते 5 अंशांनी अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट आहे. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे हे वर्ष उष्णवर्षाच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.