
पाथर्डी, तालुक्यातील जिरेवाडी गावातील असलेल्या संत वामनभाऊ, भगवान बाबा व विठ्ठल-रुक्मिणी सार्वजनिक मंदिराची दानपेटी चोरटय़ांनी पळविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, पळविलेल्या दानपेटीतील रक्कम काढून घेत चोरटय़ांनी दानपेटी एका शेतात फेकून दिली. मुकुंद महादेव आंधळे यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिरेवाडी गावात असलेल्या सार्वजनिक मंदिराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याची माहिती सोमवारी सकाळी सात वाजता ग्रामस्थांच्या लक्षात आली. दरवर्षी वामनभाऊच्या पुण्यतिथीनंतर दुसऱया दिवशी सर्व ग्रामस्थांसमोर दानपेटी उघडली जाते.
दरवर्षी दानपेटीत अंदाजे 60 हजार रुपये निघतात. रविवारी (दि. 25) रात्री आंधळे हे मंदिरात दर्शनाला गेले, त्यावेळी दानपेटी मंदिरात होती. त्यानंतर आज सकाळी मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची माहिती समजली. मंदिराच्या गेटचे लोखंडी कुलूप तोडून मंदिरात असलेली लोखंडी दानपेटी चोरटय़ांनी चोरून नेली. काही अंतरावर रक्कम काढून घेत दानपेटी एका शेतात टाकून दिली.