
तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. यात 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या मनोज ऊर्फ मोडेम बाळकृष्ण याचाही समावेश आहे. मोडेमचा मृत्यू हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे. गारियाबंद परिसरात नक्षलवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची शोधमोहीम आखली.
नक्षलवाद्यांचा टॉपचा नेता गरियाबंद परिसरात असल्याची खातरजमा केल्यानंतर सुरक्षादलांकडून तत्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेला आज मोठे यश आले. राज्य पोलीस, सीआरपीएफ अर्थात पेंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा बटालियन यांच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला मोडेम बाळकृष्ण हा ओदिशा राज्य समितीचा वरिष्ठ सदस्य होता. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवताना अचानक सुरक्षा दलांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी 10 नक्षलवाद्यांना ठार केले.