
रायगड जिल्ह्यातील दहा तालुके सध्या भीषण पाणीटंचाईने होरपळले आहेत. त्याची झळ 273 गावपाड्यांमधील सुमारे एक लाख ग्रामस्थांना बसली असून माता-भगिनींची हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. दरवर्षी जिल्हा परिषद पाणी पुरवठ्याचे नियोजन करीत असते. पण यंदा हे नियोजन सपशेल फेल ठरले आहे. टंचाईग्रस्त तालुक्यांना 37 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून दुर्दैवाचे फेरे संपणार तरी केव्हा, असा सवाल रायगडवासीयांनी केला आहे.
पाणीटंचाईच्या गावांमध्ये वाढ
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील 35 गावे-वाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामध्ये 3 गावे व 32 वाड्यांचा समावेश होता. मागील सवा महिन्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये 238 ने वाढ झाली असून सद्यस्थितीत 273 गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये 39 गावे व 234 वाड्यांचा समावेश असून त्यांना 37 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो. पण पाण्याची साठवणूक योग्य प्रकारे होत नसल्याने ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्याची लोकसंख्या 22 लाखांच्या वर गेली आहे. एकूण 31 धरणे असून त्यातील पाणी अपुरे पडते. लोकसंख्येच्या मानाने धरणांची संख्या कमी आहे. त्याशिवाय पावसाचे पाणी थेट समुद्राला मिळत असल्याने त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. धरणाची संख्या वाढवावी व पावसाचे पाणी त्यात साठवल्यास रायगडातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी अलिबाग, उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या दहा तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
273 गावे व वाड्यांना 37 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे दिसून येते. यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते


























































