नगरमधील कचरा संकलन, वाहतुकीसाठी आलेल्या निविदा उघडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी कर्नाटकातील बंगळुरू व गुजरातमधील अहमदाबाद येथील कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांची दरपत्रके उघडण्यात आली आहेत. यात दोन्ही कंपन्यांनी सध्याच्या (स्वयंभू ट्रान्सपोर्ट) दरापेक्षा प्रतिटन 800 ते एक हजार रुपयांनी म्हणजेच 50 टक्क्यांपेक्षा अधिक दर प्रस्तावित केला आहे. या निविदा मंजूर केल्यास या कामासाठी सध्याच्या खर्चापेक्षा सुमारे चार कोटी रुपयांचा जादा बोजा महापालिकेवर पडणार आहे.

महापालिकेकडे पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी व अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी या तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या होत्या. या निविदांपैकी पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीची निविदा तांत्रिक छाननीदरम्यान बाद करण्यात आली आहे. उर्वरित दोन कंपन्यांच्या निविदा उघडण्यात आल्या आहेत. यात पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने प्रतिटन दोन हजार 700 रुपये व श्री जी एजन्सी या कंपनीने प्रतिटन दोन हजार 550 रुपये दर प्रस्तावित केला आहे.

शहरात सध्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेद्वारे काम सुरू आहे. त्यांना प्रतिटन एक हजार 717 रुपये दर मंजूर आहे. शहरात दररोज सुमारे 130 ते 140 टन कचरा संकलन होत असल्याने मनपा दरवर्षी या कामासाठी आठ ते नऊ कोटी रुपये खर्च करत आहे. नव्याने दाखल निविदांमधील सर्वात कमी दर असलेली अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी कंपनीची प्रतिटन दोन हजार 550 रुपये दराची निविदा मंजूर केल्यास महापालिकेला दरवर्षी सुमारे 13 कोटींपर्यंत खर्च करावा लागणार आहे. सध्याच्या खर्चापेक्षा हा खर्च चार कोटींनी अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे याबाबत महापालिका प्रशासन आता काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.