भाजपमध्ये ‘चिंता’मनीचा प्रवेश; 2019 काय होणार…?

58
bjp-ticket-politics

नीलेश कुलकर्णी । नवी दिल्ली

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून सपाटून मार खावा लागल्याने भाजपच्या गोटात 2019 ला आपले काय होणार हा चिंतेचा सूर आज दिसून आला. त्याच वेळी या निकालांमुळे काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लाटे’चा अंदाज घेऊन भाजपवासी झालेल्या अनेक ‘आयाराम-गयारामां’नी घरवापसीसाठी प्रयत्न सुरू केल्याने भाजपच्या अडचणी अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधानांसह सत्ताधारी पक्ष निव्वळ भाषणबाजी आणि वैयक्तिक पातळीवर हिणकस टीका करत असताना राहुल गांधींनी कौल दत्तात्रय गोत्राचा उच्चार करत ‘सौम्य हिंदुत्वाचा पंचा’ खांद्यावर घेतला. त्या सौम्य हिंदुत्वाने काँग्रेसला राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेशात मोठा आधार दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. विशेषतः मध्य प्रदेशात ऍट्रॉसिटीविरोधात सवर्णांमध्ये असलेल्या रोषाने भाजपला मोठा झटका दिल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. राजस्थानात ब्राह्मण राजपुतांनी काँग्रेसची पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या. मात्र सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विचित्र कारभारामुळे भाजपच इतिहासजमा होते की काय अशी परिस्थिती आहे.

मोदींची वाट बिकट
2014 मध्ये भाजपला लोकसभेत दणदणीत यश मिळवून देण्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा मोलाचा वाटा होता. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या एकूण 65 जागांपैकी भाजपने तब्बल 62 जागी विजय मिळवला होता. राजस्थानात सर्वच्या सर्व 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या तर मध्य प्रदेशात 29 पैकी 27 जागा खिशात टाकल्या होत्या. कमलनाथ व ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघेच काँग्रेस उमेदवार मध्य प्रदेशातून काँग्रेसतर्फे निवडून गेले होते, तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी केवळ एकाच जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र सध्याच्या निवडणूक निकालाचा रागरंग बघता या 62 पैकी 40 जागांवर भाजपला फटका बसू शकतो. त्याच वेळी गुजरातमध्ये भाजप 2014 प्रमाणे सर्वच्या सर्व 26 जागा जिंकण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गुजरातमध्ये फटका बसल्यास महाराष्ट्रात संख्याबळ घटले तर नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग बिकट होऊ शकतो.

मोदींना हरवता येऊ शकते हे राहुल गांधींनी दाखवून दिले – राजीव सातव
मोदींना हरवताही येऊ शकते ही बाबच आम्ही विरोधक विसरून गेलो होतो. मात्र मोदींना नुसते हरवणेच नाही तर चारीमुंडय़ा चीतही करता येऊ शकते हा आत्मविश्वास राहुल गांधी यांनी या निकालाद्वारे दिला आहे, असे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

शंभरच्या वर आयाराम-गयाराम काय करणार?
लोकसभेत भाजपच्या निवडून आलेल्या 284 पैकी (नंतर पोटनिवडणुकांत हा आकडा 272 पर्यंत घसरलेला आहे) शंभरच्या वर खासदार हे आयात आहेत. सरकारमध्ये राहूनही काम होत नसल्याने अनेक जण निवडणूक लढविण्यास अनुत्सुक होते, मात्र अचानक काँग्रेसचे ग्रहमान बदलल्याने या असंतुष्टांनी काँग्रेसशी संपर्क साधायला सुरुवात केली.

आठवलेजी, काँग्रेस में आओ…
भाजपसोबत घरोबा केलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंना आज अनौपचारिक गप्पांमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे खुले आमंत्रण दिले. ‘भाजपा की अब वापसी नही होगी. आप आइये हमारे साथ’ असे म्हणत जयरामांनी आठवलेंना चुचकारले.

आपली प्रतिक्रिया द्या