लाडक्या बहिणींसाठी अडवला निधी, शिंदे गटाच्या अस्वस्थतेला वाचा फुटली

आमदारांना करण्यात येणाऱया निधीच्या वाटपावरून महायुतीत खटके उडू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मंत्र्यांपाठोपाठ लाडक्या बहिणीसाठी आमचा निधी अडवला जातोय, अशी ओरड शिंदे गटाच्या आमदारांनी सुरू केली आहे.

‘लाडकी बहीण योजने’मुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. या योजनेसाठी वेगवेगळय़ा विभागांचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवल्याची तक्रार अनेक आमदार व मंत्री करत आहेत. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘लाडकी बहीण योजने’मुळे राज्य संकटात आहे. या योजनेमुळे इतर कुठल्याही योजनेला पैसे मिळालेले नाहीत. कोणत्याही आमदाराला मागील अधिवेशनात जाहीर झालेला निधी मिळालेला नसल्याचे सांगत महायुतीला घरचा अहेर दिला आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या खात्याला निधी कमी पडणार नाही याची खबरदारी घेत आहेत. यामुळे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

अजितदादांच्या कार्यपद्धतीवरून मंत्र्यांमध्ये नाराजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून शिंदे गटात नाराजी आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने सगळय़ांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. विकासनिधीचे समान वाटप होणे आवश्यक आहे. पण अजित पवार आमच्या खात्यांना पुरेसा निधी देत नाहीत. मग विकासकामे करायची कशी, अशी विचारणा शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून केली जात आहे.

निधीचा निर्णय तिघे मिळून घेतो – अजित पवार

‘लाडकी बहीण योजने’साठी 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काटकसरदेखील करत आहोत. निधीबाबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे असे आम्ही तिघे मिळून निर्णय घेतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

मंत्री संजय शिरसाट अस्वस्थ

सामाजिक न्याय विभागाच्या 6 हजार 765 कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ व अन्य योजनांसाठी वर्षभरात इतर विभागांकडे वळविण्यात येणार आहेत. यामुळे मंत्री संजय शिरसाट कमालीचे अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.