
मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असतानाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. सोमवारी रात्री चिपळूणजवळील पिंपळी (केनॉल) येथे भरधाव थार जीप आणि प्रवासी रिक्षाचा झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चौघांचा समावेश असून थार चालकाचाही त्यात मृत्यू झाला आहे.
हरयाणातील क्रमांकाची थार गाडी वेगाने जात असताना समोरून येणाऱया रिक्षाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की रिक्षा चक्काचूर झाली. रिक्षातील चौघे प्रवासी जागीच ठार झाले, तर थारचा चालकही मृत्यूमुखी पडला. अपघातानंतर थार गाडी समोरून येणाऱया ट्रकला धडकली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर उघडकीस आलेली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, थार गाडीत एक महिला होती. चालकाने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या अगोदर ती महिला “वाचवा, वाचवा’’ अशी आरडाओरड करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या सतर्कतेने खेर्डी येथे या महिलेला सुखरूप वाचवण्यात आले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चार नागरिकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. महामार्गावरील वारंवार होणाऱया अपघातांमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच चिपळूणचे डीवायएसपी बेले, पोलीस निरीक्षक यंत्रणेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. पुढील तपास सुरू असून थार गाडी नेमकी कशी व कोणत्या उद्देशाने प्रवास करत होती, तसेच अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे.