
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे. त्यामुळे दिल्लीत आणि इतर महत्त्वाच्या स्थळांवर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने ‘कोड 26-26’ अंतर्गत हे षडयंत्र रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या गंभीर इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी एक विशेष ‘वॉन्टेड’ नोटीस जारी केली आहे. यामध्ये संशयित दहशतवादी आणि दिल्लीचा रहिवासी असलेल्या मोहम्मद रेहानचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच, या पोस्टरमध्ये बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे येथील स्फोटासह दक्षिण हिंदुस्थानातील अनेक बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानल्या जाणाऱ्या शाहिद फैसलचेही नाव सामील आहे. 26 जानेवारीपूर्वी देशाच्या विविध भागांत एकाच वेळी हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांच्या या ‘कोड 26-26’ च्या निशाण्यावर प्रामुख्याने देशातील मोठी मंदिरे आहेत. या स्फोटातून जातीय तणाव निर्माण करता येईल, असा त्यांचा उद्देश आहे. यामध्ये अयोध्येतील राम मंदिर आणि जम्मूतील रघुनाथ मंदिराचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील सर्व सुरक्षा संस्था, पोलीस दल आणि सीमावर्ती भागातील बीएसएफला (BSF) अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


























































