
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवाराजवळील भगूर वस्तीवर हल्ला करून तीन शेळ्या मारून खाऊन टाकल्या तर एक शेळी जखमी केली. तसेच दाभाडेववस्तीवरील दोन बकरे मारून टाकले त्यामुळे या परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी वन खात्याकडे केली आहे.
माहेगाव देशमुख शिवारात माजी आमदार अशोक काळे यांच्या शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर गायकवाड यांनी बिबट्या सदृश्य प्राणी दोन वेळा बघितला. या बिबट्यानेच परिसरातील वस्तीवर धुमाकूळ घातला आहे. रामनाथ काळे यांच्या वस्तीवरही या प्राण्याने दोन गायीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाईंनी दावे तोडून पलायन केल्याने बिबट्या पळून गेला. दरम्यान, या प्रकाराची सर्व माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवली आहे.






























































